• Mon. Jun 15th, 2026
    333 ची गोळाबेरीज; पुण्याच्या जागेवर भाजपचा ‘फायनल’ दावा! स्थानिक आघाड्यांची रसद, राष्ट्रवादीवर दबाव वाढला

    Maharashtra Vidhan Parishad Election Pune Seat : भाजपचे जिल्हाभरात एकूण ३०९ सदस्य निवडून आलेले असून त्यात आता दोन प्रभावी स्थानिक आघाड्यांची भर पडली आहे. त्यामुळे गणेश बीडकर यांनी मांडलेल्या नव्या राजकीय गणितानुसार, पुणे जिल्ह्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरत आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रशांत आहेर, पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अधिकच गडद होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने केवळ स्वतःच्या संख्याबळावर नव्हे, तर जिल्ह्यातील स्थानिक आघाड्यांचीही साथ जोडत पुण्याच्या जागेवर थेट दावा ठोकला आहे. पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी भाजप आणि मित्र आघाड्यांकडे मिळून तब्बल ३३३ मतांची ताकद असल्याचा दावा करत पुण्याची जागा भाजपला मिळावी, अशी थेट मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांची नुकतीच एक बैठक पार पडली असून त्यात पुण्याची जागा ही भाजपनेच लढवावी असा सूर आवळण्यात आला आहे.

    स्थानिक आघाड्यांच्या पाठिंब्याने भाजपची ताकद वाढली

    बीडकर यांनी मांडलेल्या नव्या राजकीय गणितानुसार, पुणे जिल्ह्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजपचे जिल्हाभरात एकूण ३०९ सदस्य निवडून आलेले आहेत. त्यात आता दोन प्रभावी स्थानिक आघाड्यांची भर पडली आहे. इंदापूरमधील ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’चे ७ सदस्य तसेच दौंडमधील ‘नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी’चे १७ सदस्य. या दोन्ही आघाड्यांची २४ मते आणि भाजपची ३०९ मते मिळून एकूण ३३३ मतांची भक्कम ताकद भाजपकडे असल्याचा दावा करण्यात येत आहे. या ‘३३३’च्या आकड्यावरूनच पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा भाजपलाच मिळाली पाहिजे, असा सूर पक्षातील स्थानिक नेत्यांकडून उमटत आहे.
    Maharashtra TimesManisha Hawaldar : पुण्यातील मुख्याध्यापिका ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी जाळ्यात, महिन्यावर आलेली नोकरीला कलाटणी देणारी घटना, त्याआधीच गोत्यात

    दिवंगत नेते अजित पवार गटावर दबाव वाढला?

    पुणे जिल्हा हा परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभावक्षेत्र मानला जातो. मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे सध्या २९८ सदस्य असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. भाजपचे स्वतःचे ३०९ सदस्य हे ‘राष्ट्रवादी’पेक्षा अधिक आहेत. त्यात स्थानिक आघाड्यांची २४ मतांची भर पडल्यामुळे भाजपने तब्बल ३५ मतांची आघाडी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे महायुतीतील जागावाटपात पुण्याची जागा भाजपनेच लढवावी, यासाठी पक्षाने जोरदार लॉबिंग सुरू केल्याचे चित्र आहे.

    संजय शिरसाटांनी त्यांच्या पक्षाचं बघावं, शिवसेनेचे पदाधिकारी आमच्याही संपर्कात; चिखलीकरांचा पलटवार

    पुणे महापालिकेतील ‘११९’चे गणित निर्णायक?

    पुणे महापालिकेत भाजपची ताकद हेच बीडकर यांच्या दाव्याचे मुख्य आधारस्थान मानले जात आहे. महापालिकेतील १६५ सदस्यांपैकी तब्बल ११९ सदस्य भाजपचे आहेत. त्या तुलनेत अजित पवार गटाकडे केवळ २७ सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. शहरातील या वर्चस्वामुळे आणि जिल्ह्यातील ३३३ मतांच्या एकत्रित ताकदीमुळे पुण्याची जागा अखेरीस भाजपलाच मिळेल, असा विश्वास भाजप नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
    Maharashtra TimesMumbai News : मुंबईतील भिकारी निघाला मेडिकलचा विद्यार्थी, मालाड पोलिसांनी नांदेडचा ठावठिकाणा शोधला, ‘अभय’ला पाहताच कुटुंब गदगदलं
    दरम्यान, गणेश बीडकर स्वतः इच्छुक असल्याने त्यांनी स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी आणखी तीव्र केली आहे. ‘३३३’चा आकडा पुढे करत भाजपने आता राजकीय दबाव वाढवला असून, ही जागा मित्रपक्षाला दिल्यास कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल, अशीही भीती स्थानिक नेतृत्वातून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता भाजपच्या या ‘३३३ च्या चक्रव्यूहा’तून अजित पवार गट स्वतःसाठी जागा कशी मिळवतो आणि महायुतीचे वरिष्ठ नेते हा तिढा कसा सोडवतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा