• Sat. Jun 6th, 2026
    Sindhudurg Underwater Museum : सिंधुदुर्गात देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार; डिस्कव्हर स्कुबा डायव्हिंग ते अंडरवॉटर फोटोग्राफी पर्यटन

    मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका ‘एक्स-आयएनएस गुलदार’ समुद्रतळावर यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे. देशातील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकार होत आहे. मे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या समन्वयाने राबविण्यात येणारा हा प्रकल्प भारतीय पर्यटन क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले असून हा प्रकल्प जागतिक स्तरावर सागरी पर्यटन आकर्षण म्हणून उदयास येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

    भारतातील पहिल्या एकात्मिक सबमरीनव्दारे अनुभवात्मक पर्यटनाची सुरुवात होत असून या पर्यटन स्थळामध्ये मार्गदर्शित व्रेक डायव्हिंग व सबमरीन अनुभव, डिस्कव्हर स्कुबा डायव्हिंग (12 मीटरपर्यंत), प्रमाणित डायव्हर मोहिमा (18 मीटरपर्यंत), अॅडव्हान्स डायव्हिंग अनुभव (30 मीटरपर्यंत), अंडरवॉटर फोटोग्राफी पर्यटन, सागरी शिक्षण व संशोधन करता येणार आहे. डायव्हिंग स्लॉट्स, सबमरीन बुकिंग आणि पर्यटक सुविधांबाबतची माहिती लवकरच एमटीडीसीच्या अधिकृत माध्यमांतून जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे सहकार्य, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव, संजय खंदारे आणि एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे (भाप्रसे) यांच्या प्रयत्नांतून या प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पर्यटन मंत्रालय, भारत सरकारच्या जागतिक दर्जावर आयकॉनिक पर्यटन केंद्रांचा विकास भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य (SASCI) या योजनेतंर्गत एमटीडीसी मार्फत विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने रु.46.91 कोटी तर महाराष्ट्र शासनाने ₹112.46 कोटी इतक्या रक्कमेस मंजुरी दिली आहे, अशी देखील माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

    एक्स-आयएनएस गुलदार ही भारतीय नौदलातील ‘मगर’ वर्गातील लँडिंग शिप टँक (LST) प्रकारातील युद्धनौका असून तिने तब्बल 39 वर्षे राष्ट्रसेवा बजावून 12 जानेवारी 2024 रोजी भारतीय नौदलामधून निवृत्त झाली. पोलंडमधील ग्डिनिया शिपयार्ड येथे 30 डिसेंबर 1985 रोजी नौकेचे उद्घाटन झाले होते. 83.9 मीटर लांबीची ही नौका उभयचर युद्ध कारवाई, सैनिक व रसद वाहतूक, किनारी सुरक्षा तसेच विविध नौदल सराव मोहिमांमध्ये कार्यरत होती.

    मे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), मुंबई यांच्या माध्यमातून 19 मे 2026 रोजी सिंधुदुर्ग किनाऱ्यावरील निवती रॉक परिसरात सुमारे 22 मीटर खोलीवर नौका समुद्रतळावर स्थापित करण्यात आले. या स्थळाची निवड महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था यांच्या सविस्तर वैज्ञानिक अभ्यासानंतर करण्यात आली असून परिसरात नैसर्गिक प्रवाळभित्ती नसल्याचे तसेच विपरित पर्यावरणीय परिणाम नसल्याचे प्रमाणीत झाले आहे, असेही मंत्री देसाई असे म्हणाले.

    स्कटलिंगपूर्वी नौकेची पर्यावरणीय स्वच्छता करण्यात आलेली असून एक्स-आयएनएस गुलदारची मजबूत पोलादी रचना आता कृत्रिम प्रवाळभिंत्ती म्हणून कार्य करणार असून त्यामुळे समुद्री जैवविविधता, प्रवाळ वाढ, मासेमारी संसाधने आणि पर्यावरणीय संतुलनास चालना मिळणार आहे. या प्रकलामध्ये जेट्टीवरुन स्पीडबोट द्वारे निवती रॉक येथे पोहोचणे व तेथील बार्जवर उतरुन पाणबुडी किंवा स्कूबा व्दारे जहाजामधील प्रवाळ, मत्स्य पाहणी करणे अपेक्षित आहे.

    प्रकल्पामुळे होणारे बहुआयामी परिणाम

    या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीतील पर्यटन अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. देश-विदेशातील पर्यटकांच्या वाढत्या आगमनामुळे स्थानिक व्यवसाय, निवास व्यवस्था, वाहतूक, खाद्यव्यवसाय आणि पर्यटन सेवांमध्ये आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे. दीर्घकालीन दृष्टीकोनातून हा प्रकल्प स्थानिक आर्थिक विकासासाठी व स्थानिक रोजगारासाठी, पूरक व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे.

    एक्स-आयएनएस गुलदार प्रकल्पामुळे महाराष्ट्रात प्रथमच जागतिक दर्जाचा पाणबुडी पर्यटन अनुभव विकसित होत आहे. साहसी पर्यटन, स्कुबा डायव्हिंग, अंडरवॉटर एक्सप्लोरेशन आणि सागरी पर्यटन क्षेत्राला नवे परिमाण प्राप्त होणार असून महाराष्ट्राची ओळख देशातील अग्रगण्य साहसी पर्यटन स्थळ म्हणून निर्माण होण्यास मदत होणार आहे. समुद्रतळावर स्थापित करण्यात आलेली युद्धनौका कालांतराने कृत्रिम प्रवाळभित्ती (Artificial Reef) म्हणून विकसित होणार असून त्यामुळे सागरी जैवविविधतेला पोषक वातावरण निर्माण होईल. विविध प्रकारचे मासे, सागरी वनस्पती आणि सूक्ष्म जीवांसाठी हे संरक्षित अधिवास (Habitat) ठरणार आहे.

    भारतीय नौदलाच्या सेवेत कार्यरत राहिलेल्या युद्धनौकेचा पर्यावरणपूरक व पर्यटनाभिमुख पद्धतीने पुनर्वापर करण्यात येत असून हा उपक्रम राष्ट्रसेवेतील ऐतिहासिक वारशाला अभिवादन करणारा आहे. या माध्यमातून नौदलाचा गौरवशाली इतिहास आणि सागरी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात मदत होणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राला नाविन्यपूर्ण आणि शाश्वत पर्यटन प्रकल्प राबविणाऱ्या अग्रगण्य राज्यांमध्ये स्थान मिळवून देणार आहे. तसेच भारताच्या सागरी पर्यटन क्षमतेची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी ओळख निर्माण करण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र व भारताची शाश्वत व नाविन्यपूर्ण पर्यटन क्षेत्रातील जागतिक ओळख अधिक मजबूत करणार आहे.

    फ्लोरिडा (अमेरिका) येथील युएसएस ऑरिस्कनी आणि ऑस्ट्रेलियातील एचएमएएस स्वॅन यांसारख्या जागतिक दर्जाच्या व्रेक डायव्हिंग स्थळांपासून प्रेरणा घेत विकसित करण्यात आलेला आहे. हा प्रकल्प भारतातील पहिला जागतिक स्तरावरील अंडरवॉटर म्युझियम आणि कृत्रिम प्रवाळभित्ती पर्यटन उपक्रम ठरणार आहे. MTDC तर्फे देश-विदेशातील पर्यटक, स्कुबा डायव्हर्स, सागरी अभ्यासक, विद्यार्थी, छायाचित्रकार व संशोधकांना या अद्वितीय अंडरवॉटर पर्यटन अनुभवासाठी निमंत्रित करण्यात येत आहे, अशी बाब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी स्पष्ट केली.

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed