IMD El Nino Impact: भारतीय हवामान विभगाने एल निनो आणि ला निनोबद्दल एक शोधनिबंध प्रकाशित केला असून यामध्ये भारतावर या प्रणालीचा नेमका कसा परिणाम होणार आहे हे स्पष्ट केले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: भारतीय उपखंडामध्ये निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या लाटा अधिक काळ टिकणाऱ्या, अधिक तीव्र आहेत. तसेच त्यांची वारंवारता वाढत आहे. या लाटांसंदर्भात भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये एल निनो आणि तीव्र तापमानाचा संबंध असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. एल निनो असलेल्या वर्षांमध्ये ला निनाच्या वर्षांपेक्षा उष्णतेच्या लाटांची व्याप्ती आणि तीव्रता अधिक असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
एल निनो आणि ला निनोचा परिणाम
संपूर्ण भारतामध्ये उष्णतेच्या लाटांमध्ये एल निनोच्या काळात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. मान्सूनपूर्व काळामध्ये एल निनोमुळे कमाल तापमानात मोठ्या फरकाने वाढ होते. यामध्ये मध्य भारतासोबतच वायव्य भारत, दक्षिण भारताचा काही भाग यावर अधिक परिणाम होताना दिसतो. ला निनाच्या वर्षांमध्ये उष्णतेच्या लाटांचे प्रमाण कमी होते आणि तुलनेने कमाल तापमानही कमी असते. एल निनो सक्रिय असताना पावसात घट होते. तसेच मातीमध्येही आर्द्रतेचे प्रमाण कमी असते. त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते. एल निनो आणि ला निना सक्रिय असताना उष्णतेचा परिणाम नेमका कसा होतो हे समजून घेतले तर त्यानुसार उष्णतेच्या लाटांना तोंड देताना प्रशासन आणि नागरिकही अधिक तयार राहतील, असे डी. एस. पै आणि स्मिता नायर या अभ्यासकांनी स्पष्ट केले.Weather Update: मान्सूनपूर्व पावसामुळे महामुंबईला दिलासा मिळणार; येत्या 48 तासांत शहरात पावसाची हजेरी, ‘आयएमडी’चा इशारा
नागरिकांना अतिउष्ण वातावरण जाणवत असताना तापमानाचा पारा मात्र फारसा चढा नसतो. या पार्श्वभूमीवर लोकांना होणारी उष्म्याची जाणीव आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा यामध्ये फरक असल्याचे दिसते. यासाठी देशातील उष्णतेच्या लाटेची घोषणा करण्याचे निकष भारतीय हवामान विभाग बदलणार असल्याचे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार समोर आले आहे. सध्याच्या निकषांच्या मर्यादांमुळे उष्णतेच्या लाटेचे इशारे देण्यात अडचण येत असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
रात्रीही उष्ण वातावरण
केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थितीमुळे उष्णता आणि आर्द्रतेला सामोरे जावे लागले. भारताच्या दक्षिण किनारपट्टीजवळ अशा प्रणाली निर्माण होत नव्हत्या. त्यामुळे या उष्णतेच्या जाणिवेसाठी पूर्वीचे अनुभव साह्यभूत ठरले नाहीत, असेही सांगण्यात आले. अशी प्रणाली भारताच्या वायव्य भागांवर आढळते, परंतु यंदा ती दक्षिणेकडील प्रदेशाजवळ तयार झाली, ज्यामुळे रात्री उष्ण वातावरण निर्माण झाले. या आधारे येत्या काळात उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि त्यासंदर्भातील इशारे यामध्ये बदल करण्यात येईल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
El Nino: इतिहासातील सर्वात तीव्र ‘एल निनो’चा अंदाज; यंदा जूनमध्ये सक्रिय होणार, संपूर्ण मान्सून हंगामावर परिणाम
वाढत्या उष्म्याने शेतमालाचे नुकसान
यंदाच्या उन्हाळ्यात उष्मा अधिकच वाढल्याने याचा शेतमालावर परिणाम होत आहे. भाजीपाला, फळे, कांदे-बटाटे हा शेतमाल मुंबईच्या बाजारात येईपर्यंत प्रवासात मालाचे नुकसान होत आहे. त्यामुळे बाजारात चांगल्या मालाचा तुटवडा भासत आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा