Mumbai Local: मुंबई लोकलच्या वाढत्या गर्दीमुळे नव्या व सुधारित एसी लोकल लवकरच मुंबईकरांसाठी दाख होण्याची शक्यता असताना ट्रेनच्या बांधणीला उशीर होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कशामुळे विलंब झाला?
‘एमआरव्हीसी’च्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (’एमयूटीपी’) तीन आणि तीन अ अंतर्गत एकूण 238 वातानुकूलित लोकलची बांधणी करण्यात येत आहे. वीस हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीची ही निविदा प्रक्रिया आहे. मात्र ही प्रक्रिया सुरू असतानाच ‘एमआरव्हीसी’ने शुद्धीपत्रक जाहीर केले आहे. दुरुस्तीपत्रकानुसार, बोली सादर करण्याची ऑनलाइन प्रक्रिया आता 19 जुलैपासून सुरू होणार आहे. याआधी 18 मेपासून प्रक्रिया सुरू होणार होती. बोली सादर करण्याची अंतिम मुदत, मूळ कागदपत्रे जमा करण्याची तारीख आणि ई-निविदा उघडण्याची प्रक्रिया 2 जूनऐवजी आता 3 ऑगस्टला होणार आहे.
India’s First Bullet Train: फक्त 2 तासांत मुंबई ते अहमदाबाद, 320चा वेग, महाराष्ट्रात 4 थांबे; भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक समोर
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांत 238 एसी लोकल बांधणी प्रकल्पाचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही निविदा प्रक्रिया सुरू असून अद्याप ती पूर्णत्वास आलेली नाही. मध्य आणि पश्चिम रेल्वेने सुचवलेले तांत्रिक आणि कार्यात्मक बदल, उपनगरीय रेल्वेमध्ये टप्प्याटप्प्याने वातानुकूलित लोकल गाड्यांचा समावेश आणि जागतिक निविदादारांकडून आलेल्या मोठ्या प्रमाणावरील तांत्रिक प्रश्नांसह शंका व त्यांना देण्यात येणारे समाधानकारक पर्याय यामुळे ही प्रक्रिया लांबत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रस्तावित 238 वातानुकूलित गाड्यांपैकी 47 गाड्या ‘एमयूटीपी तीन’ आणि 191 गाड्या ‘एमयूटीपी तीन अ’ अंतर्गत बांधल्या जाणार आहेत. भारतीय रेल्वेच्या उपनगरी वातानुकूलित गाड्यांमधील ही सर्वांत मोठी निविदा प्रक्रिया असून बांधणीसह देखभालीची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची असणार आहे. नव्या वातानुकूलित लोकल गाड्यांचा वेग ताशी 130 किमी असणार आहे. महामुंबईतील प्रवासी गर्दी लक्षात घेऊन आधुनिक बदल नव्या गाड्यांमध्ये अपेक्षित आहेत.
स्वयंचलित पद्धतीने एसीचे नियमन
- अत्याधुनिक ‘एचव्हीएसी’ (हीटिंग, व्हेंटिलेशन व एअर कंडिशनिंग) प्रणाली
- गर्दीच्या प्रवासासाठी उच्च कार्यक्षमतेची फिल्टरेशन सुविधा
- प्रवासी संख्येनुसार स्वयंचलित पद्धतीने हवा नियंत्रित करणारी यंत्रणा
अशी असेल एसी लोकल गाडी
- डब्यांची जोडणी असल्याने गर्दीचे विभाजन शक्य
- डब्याच्या आतील यंत्रणा छतावर, तळाला असल्याने अधिक मोकळी जागा
- गादीयुक्त आसने, दिव्यांग व व्हीलचेअर वापरणाऱ्यांसाठी राखीव जागा.
Pen-Panvel Local Train: पेण तालुक्यात ‘तिसरी मुंबई’; तरी थेट पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षाच, हजारो प्रवाशांचे दररोज हाल
मध्य रेल्वेच्या महसुलात वाढ
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने यंदाच्या एप्रिलमध्ये 570.42 कोटी रुपयांची कमाई केली आहे. एप्रिल 2025मध्ये विभागाने 527.17 कोटी रुपयांची कमाई केली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आठ टक्के अधिक महसुलाची नोंद झाली आहे. भाडे-व्यतिरिक्त महसूल (नॉन फेअर रेव्हेन्यू), जाहिराती, ‘ईएमयू’ रॅपिंग, गेमिंग झोन, वेटिंग रूम-कम-कँटीन आणि इतर नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे महसुलाला चालना मिळाली. तिकीट तपासणी मोहिमेतून 16.13 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. भाडे-व्यतिरिक्त महसूलही वाढून 13.44 कोटी रुपये झाला आहे. डब्यांचा वापर करून येणारा महसूल 353 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
