• Sat. Jun 6th, 2026
    Shaktipeeth Highway Protest: शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात सर्वपक्षीय वज्रमुठ; 9 जूनच्या आंदोलनामुळे सरकारची कोंडी होण्याची शक्यता

    कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश तीव्र झाला असून 9 जून रोजी भव्य मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. 78 गावांचा समावेश आणि जमिनीच्या भूसंपादनावरून आंदोलन अधिक आक्रमक होत असून सरकारसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद मेहेंद्रकर, कोल्हापूर: राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरेखनाविरोधात राज्यभरात शेतकरी विरोध दर्शवत आहेत. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मंगळवारी कसबा बावडा येथे झालेल्या सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्यात 9 जून रोजी दसरा चौकातून भव्य मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील 78 गावांचा या मार्गात समावेश होणार आहे. त्यामुळे या सर्व गावांमधील शेतकऱ्यांकडून विरोधाची धार अधिक तीव्र झाली आहे.

    कोल्हापुरातील कसबा बावडा येथे गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अशा टॅगलाईन खाली भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेस आमदार सतेज पाटील , शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शिवसेना उबाठा गटाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, राजू बाबा आवळे, राजीव आवळे, संपतबापू पाटील यांसह जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते आणि हजारो शेतकरी उपस्थित होते.

    नव्या अधिसूचनेवर आक्षेप

    मेळाव्यात बोलताना प्रमुख वक्त्यांनी सांगितले की, नव्या संरेखनेमुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर पिकाऊ आणि बागायती जमीन भूसंपादनात जाण्याचा धोका आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 78 गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत. हा मार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला प्रकल्प असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आमदार सतेज पाटील यांनी बोलताना आता रस्त्यावरची लढाई आणि कायदेशीर तांत्रिक लढाई तीव्र करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, यासाठी आता शड्डू ठोकून रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी मैदानात उतरलो आहे. प्रसंगी अंगावर लाठी खाऊ, जेलमध्ये जाऊ पण मागे हटणार नाही. आता आरे ला का रे उत्तर असेल. पोलिसी बळाचा वापरानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असणार आहे.” तसेच जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी आणि विविध संघटनांकडून 25 मेपूर्वी शक्य तितक्या जास्त हरकती नोंदवण्याचे आवाहनही सतेज पाटील यांनी केले आहे.

    Maharashtra TimesTukaram Mundhe: CM फडणवीसांचा कडक निर्णय, तुकाराम मुंढेंकडे आता FDAची धुरा; प्रशासनात आणखी कोणते बदल?

    महापुराचा धोका आणि शेतीचा प्रश्न

    माझी खासदार राजू शेट्टी आणि इतर नेत्यांनी महामार्गासाठी टाकल्या जाणाऱ्या भरावांचा वारणा, कासारी, पंचगंगा, भोगावती, तुळशी आणि कुंभी नद्यांच्या प्रवाहावर परिणाम होऊन पूरस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशारा दिला. विशेषतः ऐतवडे ते बहिरेवाडी आणि केर्ली ते शिरोली दुमाला या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात भराव होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. या भरावांमुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा थांबून बागायती शेतीचे नुकसान होऊ शकते, तसेच ऊस उत्पादनात घट आणि साखर उद्योगावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असेही मत मांडण्यात आले.

    “हा प्रकल्प खासगीकरण…”

    या महामार्गाचा खर्च वाढत जाऊन सुमारे 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा आरोप मेळाव्यात करण्यात आला. राजू शेट्टी यांनी संयुक्त मोजणी, ड्रोन सर्व्हे आणि जमिनीचे नमुने घेण्यास विरोध करण्याची भूमिका मांडली आहे. शेट्टी यांनी बोलताना, “हा प्रकल्प खासगीकरण आणि टोल वसुलीवर आधारित असल्याचे सांगत सरकारने जनतेच्या हिताऐवजी निवडणुकीच्या राजकारणासाठी हा मार्ग पुढे रेटला जात आहे,” असा दावा केला. तर “कोल्हापूरचा विकास हवा असल्यास पर्यायी रेल्वेमार्ग, वाहतूक दुवे आणि शेतीला बाधा न आणणारी पायाभूत कामे केली पाहिजेत,” अशी मागणीही शेट्टींकडून करण्यात आली.

    दरम्यान सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात 9 जूनचे आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यापुरते मर्यादित न ठेवता राज्यभर नेण्याचा निर्धार करण्यात आला. तर मोर्चा बघून मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग थेट रद्दच करावा लागेल, असा विश्वासही मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 9 जूनचा मोर्चा शक्तीपीठ महामार्गविरोधातील पुढील निर्णायक टप्पा ठरण्याची शक्यता आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा