NEET Exam News: ‘आरसीसी’च्या लातूरमधील मुख्य शाखेसह नऊ शाखा चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर याच्याशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकून फुटलेली प्रश्नपत्रिका रविवारी जप्त केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अर्जात धक्कादायक माहिती उघड केली आहे. ‘नीट (यूजी) परीक्षा २०२६च्या प्रश्नपत्रिका फोडण्यात आणि त्या पसरवण्यात मोटेगावकर याचा थेट सहभाग आहे.
‘नीट’चा पेपर कसा फुटला?
१ ते २ मे २०२६ : ‘गेस पेपर’ची राजस्थानमध्ये एंट्री. ‘गेस पेपर’ नावाने प्रश्नपत्रिकेसदृश संच काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. हा संच हरियाणामार्गे सिकरमध्ये पोहोचल्याचा दावा तपासात समोर आला.
३ मे २०२६ : नीट-यूजी परीक्षा पार पडली. साधारण २२ लाख ७४ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा संपल्यानंतर काही तासांतच प्रश्नपत्रिकेशी जुळणारे पीडीएफ फिरू लागल्याची चर्चा सुरू झाली. या रात्री सिकरमधून पहिला मोठा संशय. सिकरमधील एका शिक्षकाकडे विद्यार्थ्याने दोन पीडीएफ आणल्याचे वृत्त समोर आले. पीडीएफ प्रश्नपत्रिकेची ओळीनुसार पडताळणी केल्यानंतर गळतीचा संशय बळावला.
६ मे २०२६ : शिक्षकाने पीडीएफ आणि प्रश्नपत्रिकेचे स्क्रीनशॉट काढून ते एनटीएला ई-मेल केले.
८ मे २०२६ : एनटीएने माहितीची शहानिशा करून, संबंधित प्राथमिक माहिती केंद्रीय यंत्रणांकडे पाठवली. त्यानंतर पेपरफुटीचे आरोप अधिकृत स्तरावर गंभीरपणे घेण्यात आले.
११ मे २०२६ : राजस्थान पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपने सीकरमधील एका भाड्याच्या फ्लॅटमधून ‘गेस पेपर’ लीक करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला.
१३ संशयित (नावे जाहीर केलेली नाहीत) : सिकर, झुनझुनू आणि डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आले.
एका करिअर समुपदेशकाला सिकरमधून अटक.
१२ मे २०२६ : एनटीएने केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले.
१३ मे २०२६ : औपचारिक एफआयआर नोंदवल्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आणि विविध राज्यांत पसरलेल्या नेटवर्कमधील पाच मुख्य व्यक्तींना अटक केली.
शुभम खैरनार : नाशिक येथून अटक. श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना हेरून, प्रश्न पुरविण्याचे काम करीत होता.
मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल : जयपूर (राजस्थान) येथून अटक. आपल्या मुलाला लीक झालेला पेपर मिळवून देण्यासाठी त्यांनी दहा लाख रुपये दिल्याचा आरोप आहे.
यश यादव : गुरुग्राम (हरियाणा) येथून अटक.
१४ मे २०२६ (महाराष्ट्र कनेक्शन) : महाराष्ट्रातील पोलिस पथकांनी दोन मुख्य संशयितांना ताब्यात घेऊन सीबीआयकडे सुपूर्द केले.
धनंजय लोखंडे या अहिल्यानगर येथील आयुर्वेदिक डॉक्टरला अटक.
मनीषा वाघमारे या पुण्यातील ब्यूटीपार्लर चालक महिलेला अटक. वैद्यकीय विद्यार्थ्यांना गोळा करण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप.
१५ मे २०२६ : सीबीआयने बिहारमधील लॉजिस्टिक नेटवर्कचा शोध लावला. विद्यार्थ्यांना एकत्र ठेवून कॉपी करून घेण्यासाठी सुरक्षित जागा पुरवणाऱ्यांना अटक करण्यात आली.
पी. व्ही. कुलकर्णी (एनटीएमध्ये केमिस्ट्री विषयाचे तज्ज्ञ) : लातूरमधील कॉलेजचा निवृत्त अध्यापक असून, निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाला. त्यांने प्रश्न पुरविल्याचा आरोप.
१६ मे २०२६ (एनटीए एक्सपर्ट लीक) : तपासाची सुई एनटीएच्या अंतर्गत प्रशासनाकडे वळली. एका व्यक्तीने गोपनीयता भंग केल्याचे उघड झाले.
मनीषा गुरुनाथ मांढरे पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये वरिष्ठ वनस्पतिशास्त्र अधिव्याख्याता असून, तिची एनटीएकडून विषयतज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षेपूर्वी आपल्या घरी विशेष कोचिंग क्लास घेऊन जीवशास्त्राचे प्रश्न लीक केल्याचा तिच्यावर आरोप आहे.
१७ मे २०२६ (कोचिंग क्लास नेटवर्क) : सीबीआयने पेपर लीक प्रकरणाशी जोडलेल्या कोचिंग नेटवर्कचा माग काढला.
शिवराज मोटेगावकर या लातूर येथील ‘आरसीसी’ क्लासच्या संस्थापकाला अटक. पेपरफुटीत सक्रिय सहभाग असल्याच्या आरोप.
