MMRDA: मान्सून काळात पायाभूत प्रकल्पांवर सातत्यपूर्ण निरीक्षण, जलद समन्वय आणि सुरक्षा यंत्रणा सक्रिय ठेवण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी माहिती एमएमआरडीएच्या आयुक्तांनी दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई आणि परिसरात पावसामुळे उद्भवणाऱ्या समस्या लक्षात घेत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आत्तापासूनच सज्जता सुरू केली आहे. याअंतर्गत सर्व पायाभूत प्रकल्पांकरिता पावसाळ्यासाठी विशेष सुरक्षा नियम लागू केले आहेत. पाणीउपसा पंप, आपत्कालीन पथके, सीसीटीव्ही देखरेख, जलनिस्सारण स्वच्छता आणि रेड ॲलर्टवेळी उच्च-जोखीम कामे तत्काळ थांबवण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.
प्रत्येक कंत्राटदाराला स्वतंत्र मान्सून पूर्वतयारी योजना सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर करारनिहाय कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. २५ मे ते १५ ऑक्टोबरदरम्यान २४x७ नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असून, ४९ रुग्णवाहिका, ४३१ पाणीउपसा पंप आणि ५४४ सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज करण्यात आले आहेत.
Mumbai News: ‘बाइक’ बडगा राज्यात, फटका देशभरात! ओला, उबर, रॅपिडो ॲप हटवले; पण 24 तासांत सरकारची माघार
पावसाळ्यापूर्वी सर्व प्रकल्पांमध्ये आपत्कालीन मॉक ड्रिल्स, रुग्णालयांशी समन्वय, आयएमडी ॲलर्ट प्रणालीचे एकत्रीकरण आणि औपचारिक तपासण्या करण्याचे निर्देशही प्राधिकरणाने दिले आहेत. मान्सून काळात रिअल-टाइम समन्वय आणि सार्वजनिक माहिती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र माध्यम संनियंत्रण आणि जलद प्रतिसाद संप्रेषण पथकेही तैनात करण्यात येत आहेत. यंदा प्रथमच मान्सून अनुभवणाऱ्या मेट्रो-२ब आणि ९ मार्गिकांसाठी स्वतंत्र ‘मान्सून रेडीनेस ऑडिट’ करण्यात येणार असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’कडून देण्यात आली.
‘रस्ते सुरक्षित, वाहतूकयोग्य करावेत’
‘पावसाळापूर्व तयारीचा भाग म्हणून रस्ते व वाहतूक विभागाने सर्व काँक्रीट रस्ते सुरक्षित, सुस्थितीत व वाहतूकयोग्य करावेत’, असे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी दिले. ‘वाहनचालकांना अडथळा किंवा अपघाताचा धोका निर्माण होणार नाही, अशाप्रकारे काँक्रीट व मास्टिक रस्ता यांच्या जोडणीच्या ठिकाणी रस्तेपातळी एकसमान राखली जाईल याची काळजी घ्यावी’, अशी सूचनाही त्यांनी केली. आयुक्त बांगर यांनी महापालिका मुख्यालयात रस्ते काँक्रीटीकरण प्रकल्प कामांचा आढावा घेतला. ‘पावसाळ्यात मुंबईकरांना वाहतूकयोग्य, सुरक्षित रस्ते मिळतानाच वीजपुरवठा व रस्त्यावरील दिवे सुरळीत कार्यरत आहेत याची काटेकोर तपासणीकरावी. रस्तेसुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने लेन मार्किंग, थर्मोप्लास्ट चिन्हांकन, रस्तादर्शक व नामफलकांची कामे मुदतीत पूर्ण करण्यावर विशेष भर द्यावा’, असे निर्देश त्यांनी दिले.
काँक्रीटीकरण पूर्ण झालेल्या आणि २२ मेपर्यंत काँक्रीट ओतण्याची कामे पूर्ण करण्याचे नियोजन असलेल्या रस्तेकामांची परिमंडळनिहाय माहितीही बांगर यांनी घेतली. ‘काँक्रीटीकरणाची सर्व कामे ५ जूनपर्यंत पूर्ण करावीत किंवा मास्टिकमार्फत सुरक्षित करून पावसाळ्यात रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत. पावसाळ्याच्या कालावधीत कोणताही रस्ता खोदलेल्या अवस्थेत राहता कामा नये, तसेच कोणताही रस्ता बॅरिकेड्स लावून अडवला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी’, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा