• Sun. Aug 9th, 2026

    Kolhapur Politics : मुश्रीफ आणि घाटगे एकत्र; ही युती नाही महायुती, फडणवीसांची टोलेबाजी; दिली फेविकोल जोडाची उपमा

    कोल्हापूरच्या राजकारणात आज अनपेक्षित आणि फार क्वचित घडल्या असतील अशा घडामोडी घडल्या. समरजितराजे घाटगे आणि मंत्री हसन मुश्रीफ हे दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र दिसले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    कोल्हापूर : ऐतिहासिक वारसा असलेल्या कागल नगरीत आज क्रांती दिनाचे औचित्य साधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अभूतपूर्व सोहळ्यात अनावरण करण्यात आले. या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय संघर्ष बाजूला सारून मंत्री हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे, माजी खासदार संजय मंडलिक तसेच संजय घाडगे एकाच मंचावर एकत्र दिसले. मंत्री मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या या ऐतिहासिक मनोमिलनावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “हा केवळ राजकीय संघर्ष होता, वैयक्तिक नव्हता; आता हे दोन्ही नेते एकत्र येणे हा ‘फेविकोलचा मजबूत जोड आहे,” अशा शब्दांत कागलमधील नव्या राजकीय पर्वाची घोषणा केली.

    मुश्रीफ-घाटगे युती आणि फडणवीसांची टोलेबाजी

    कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्यावर विशेष भर दिला. “गेल्या अनेक दिवसांपासून मुश्रीफ साहेब आणि समरजितराजे या राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी पाठपुरावा करत होते. आज या निमित्ताने संपूर्ण महायुती एका मंचावर दिसत असून ‘नांदा सौख्य भरे’ अशा शब्दांत मी या युतीला शुभेच्छा देतो,” असे फडणवीस म्हणाले.

    देवेंद्र फडणवीस यांनी समरजितराजेंना आश्वस्त करताना स्पष्ट केले की, “मुश्रीफ साहेब, मी आणि चंद्रकांत दादांनी तुमची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे, त्यामुळे भविष्याची काळजी करण्याचे कारण नाही.” सभेमधील टाळ्यांच्या प्रतिसादावरून मिश्किल टिप्पणी करताना ते म्हणाले की, “आता यापुढे समरजितराजे बोलले की मुश्रीफ समर्थकांनी आणि मुश्रीफ साहेब बोलले की घाटगे समर्थकांनी जास्त टाळ्या वाजवल्या पाहिजेत, तरच हे ‘अंडरस्टँडिंग’ खऱ्या अर्थाने दिसेल”.

    राजर्षी शाहूंच्या विचारांचे पुरोगामी सरकार

    शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करताना फडणवीस म्हणाले की, शाहू महाराजांनी आधुनिक भारताची मुहूर्तमेढ रोवली आणि आरक्षणासारखा क्रांतिकारी निर्णय घेऊन वंचितांना मुख्य प्रवाहात आणले. “आमचे सरकार छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या आधारावरच काम करत आहे,” असे त्यांनी नमूद केले. महाराजांनी ज्याप्रमाणे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला, त्याच मार्गावर चालत सरकार सामाजिक न्याय प्रस्थापित करत असल्याचे त्यांनी सांगितले.

    शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक घोषणा आणि निर्णयांची अंमलबजावणी

    शेतकरी हिताचे मुद्दे मांडताना फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकारने 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन दिले जात आहे. “शेतकऱ्यांची 58 हजार कोटी रुपयांची वीज थकबाकी आम्ही एका फटक्यात माफ केली असून, आता शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा 12 तास मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली. ‘सौर कृषी वाहिनी’ योजनेच्या माध्यमातून पुढच्या वर्षापर्यंत 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    साखर कारखानदारीला केंद्र सरकारचे बळ

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उसाच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेली 10 हजार कोटींची इन्कम टॅक्सची तलवार कायदा बदलून कायमची हटवली आहे. “इथेनॉल निर्मितीच्या निर्णयामुळेच आज महाराष्ट्रातील साखर कारखानदारी जिवंत राहिली आहे, अन्यथा एकही कारखाना तग धरू शकला नसता,” असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखानदारीच्या उप-उत्पादनांसाठी देशातील पहिला क्लस्टर कारखाना उभारला जाईल, अशी घोषणा त्यांनी सहकार मंत्री अमित शहा यांच्या म्हणण्याचा संदर्भ देत केली आहे.

    सहकार आणि स्थानिक विकासाचा शब्द

    नागरी सहकारी बँकांसाठी देशात पहिली ‘अम्ब्रेला ऑथॉरिटी’ स्थापन करण्यात आली असून त्याचे मुख्यालय मुंबईत आहे, तसेच केंद्रीय सहकारी निबंधक कार्यालय पुण्यात हलवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कागलमधील इंदुराव घाटगे विद्यामंदिर शाळेच्या जिर्णोद्धाराचे कौतुक करतानाच, मुश्रीफ साहेब याच शाळेत शिकले आहेत, अशी आठवण त्यांनी करून दिली. शेवटी, कागल नगरपालिकेच्या प्रलंबित मागण्या आणि येथील पर्यटनाच्या विकासासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

    दरम्यान या ऐतिहासिक सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा