• Thu. Jun 18th, 2026
    ज्युनिअर कॉलेज-कोचिंग क्लासचे लागेबांधे तोडा, ‘नीट’ पेपरफुटीनंतर विद्यार्थी-पालक संतप्त, पीव्ही कुलकर्णी-मोटेगावकर सरांवर गंभीर आरोप

    Pune News : ‘नीट’, ‘जेईई’ परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ज्युनिअर कॉलेज- कोचिंग क्लास यांचे वाढते लागेबांधे, इंटिग्रेटेड कल्चर तोडण्याची गरज व्यक्त केली जात आहे. कॉलेज प्रशासन आणि क्लास प्रशासनाचे संगनमत असते. त्यामुळे विद्यार्थी कॉलेजांऐवजी क्लासला उपस्थित असतात.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात शिक्षक पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांना सीबीआयने अटक केल्यानंतर, विद्यार्थी, पालकांसह विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला असून, ज्युनिअर कॉलेज- कोचिंग क्लास यांचे लागेबांधे तातडीने तोडण्याची मागणी केली आहे. या शिक्षकांनी काम केलेल्या कॉलेज आणि संस्थेची सखोल चौकशी करण्याची मागणीही पुढे आली आहे.

    ‘नीट’, ‘जेईई’ परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ज्युनिअर कॉलेज- कोचिंग क्लास यांचे वाढते लागेबांधे, इंटिग्रेटेड कल्चर तोडण्याची गरज आहे. यात कॉलेज प्रशासन आणि क्लासच्या प्रशासनाचे संगनमत असते. त्यामुळे विद्यार्थी कॉलेजांऐवजी क्लासला उपस्थित असतात. ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी पी. व्ही. कुलकर्णी यांनी काम केलेल्या दयानंद सायन्स कॉलेज; तसेच मनीषा मांढरे काम करीत असलेल्या मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट, सायन्स, कॉमर्सच्या प्रशासनाची चौकशी होणे गरजेचे आहे. तशी मागणी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांच्याकडे केल्याचे युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी सांगितले.

    लातूर कनेक्शन

    ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख संशयित पी. व्ही. कुलकर्णी उर्फ प्रल्हाद कुलकर्णी हे लातूर येथील दयानंद महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर काही काळ मोटेगावकर सरांच्या आरसीसी कोचिंग क्लासमध्ये कार्यरत होते, असा दावा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधितांची चौकशी सुरू असल्याने ‘लातूर कनेक्शन’ला महत्त्व प्राप्त झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी युवक काँग्रेसतर्फे केली गेली आहे. कोचिंग संस्था आणि शैक्षणिक संस्थांशी आरोपींचे असलेले संबंध ‘सीबीआय’ने तपासावेत, अशी मागणी जैन यांनी केली आहे.
    Maharashtra TimesCrime News : डार्लिंग, तुझ्यासाठी दोन पेपर फोडलेत, तू मला… प्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे आक्षेपार्ह मागणी; ऑडिओ क्लीप व्हायरल

    परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात

    ‘स्पर्धेच्या काळात सर्व काही पैशांनी विकत घेता येते, अशी प्रवृत्ती वाढत आहे. गुणांसाठी विद्यार्थी किंवा प्रसिद्धी व आर्थिक फायद्यासाठी काही वर्गचालक अनैतिक मार्गांचा अवलंब करीत आहेत. यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसतो, परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. पैशाचा व सत्तेचा प्रभावही स्पष्टपणे जाणवतो. नीट परीक्षेबाबत यापूर्वीही शंका उपस्थित होऊनही सुरक्षित व न्याय्य पद्धती उभारण्यात अपयश आले. या प्रकरणाचे धागेदोरे सापडणे गंभीर असून, शिक्षक, कॉलेज, संस्था, क्लास यांची सखोल चौकशी होऊन, कारवाई करणे आवश्यक आहे,’ असे ‘आप पालक युनियन’चे मुकुंद किर्दत यांनी सांगितले.

    नीट पेपरफूटी प्रकरणी बच्चू कडू संतापले; अशोक खरात प्रकरणी पत्रकारांनी घेरलं

    मॉडर्न कॉलेजच्या प्रशासनाचा मांढरे यांच्या ‘एनटीए’च्या व्यवहाराशी कोणताही संबंध नाही. मांढरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
    Maharashtra TimesDrum Murder Case : 24 वर्षीय प्रियकराचा खून, विवाहित नर्सचं पतीच्या साथीने कृत्य, बॉडी निळ्या ड्रममध्ये सापडली, महिन्याभराने फिल्मी स्टाईल उलगडा

    ‘धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करा’

    पेपरफुटीमुळे ‘नीट’ रद्द करावी लागली, ही सरकारची नामुष्की आहे. देशातील २३ लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी. विद्यार्थ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. त्याची भरपाई सरकारकडून मिळावी, अशा मागण्यांसाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष स्वाती शिंदे आणि उपाध्यक्ष प्राजक्ता जाधव यांच्या नेतृत्वात बिबवेवाडी येथे आंदोलन करण्यात आले. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक प्रिया वंदना, अनिता मकवाना, अंजली सोलापुरे, ॲड. भावना बोराटे, रेखा जैन, अंजली देसाई, ज्योती अडागळे आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा