Bike Taxi Service: बाइक टॅक्सी कंपन्यांचे तात्पुरते परवाने रद्द केल्यानंतर परिवहन विभागाने कंपन्यांना ही सेवा देण्यास मनाई केली आहे. मात्र सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवत महामुंबईत कोणत्याही बंधनाविना बाइक टॅक्सी सुरू आहेत.
‘या प्रकरणाचा फेरआढावा सुरू असून कोणतीही कारवाई करू नये,’ असे पत्र महाराष्ट्र सायबर विभागाने प्रसृत केले. त्यामुळे बाइक टॅक्सीवरील ठोस कारवाईचा परिवहन विभागाचा दावा पोकळ ठरला आहे.
Sadabhau Khot : ‘शेट्टी, जाणकरांना ज्या पद्धतीने उचललं त्याची गरज नव्हती’, सदाभाऊ खोत यांची भूमिका
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी १२ मे रोजी राज्य पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालकांना पत्र लिहून बाइक टॅक्सी ॲप बंद करावेत आणि कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना केल्या. मंत्र्यांच्या पत्राचा आधार घेत १५ मे रोजी महाराष्ट्र सायबरने गुगल आणि ॲपलला नोटीस बजावली. त्यात ओला, उबर, रॅपिडो ॲप हटवण्याच्या सूचना देऊन स्पष्टतेसाठी लिंकही पाठवल्या होत्या.
या पत्राला २४ तास उलटण्याआधीच महाराष्ट्र सायबरने ॲपल, गुगलला पुन्हा एकदा शनिवारी पत्र पाठवले. यात १५ मे रोजी जारी केलेल्या नोटिशीवर सध्या कोणतीही कारवाई करू नये, असे म्हटले आहे. ‘बाइक टॅक्सी ॲप काढून टाकण्याबाबत काही निवेदने प्राप्त झाली आहेत. आम्ही या प्रकरणाचे मूल्यांकन करत आहोत. तोपर्यंत आधीच्या पत्राकडे दुर्लक्ष करून सध्या कोणतीही कारवाई करू नये,’ असेही नमूद करण्यात आले आहे. यावर महाराष्ट्र सायबरचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची स्वाक्षरी आहे.
सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत धोकादायक आहे. तरीही मनुष्यबळाची मर्यादा असल्याचे सांगत परिवहन विभागाकडून रस्त्यावर धावणाऱ्या बाइक टॅक्सींवर मोठ्या प्रमाणात कारवाईस टाळाटाळ केली जाते. सायबर विभागाचे ॲप हटवण्याचे आदेश २४ तासांतच रद्द होत असल्याने बेकायदा बाइक टॅक्सी सुरू ठेवण्यासाठी नक्की कोणाचा दबाव आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Amruta Fadanvis: देवेंद्रांची इकॉनॉमी फ्लाइट, अमृतांचा थेट ‘कान्स’ला नकार, मोदींच्या आवाहनानंतर फडणवीस दाम्पत्य चर्चेत
पेट्रोलवरील बाइकचाच वापर
सरकारने केवळ विजेवर धावणाऱ्या बाइक टॅक्सींना मुभा दिली आहे, मात्र चार्जिंगसह अन्य पायाभूत सुविधांचा प्रश्न उपस्थित करत कंपन्यांकडून पेट्रोलवरील बाइक टॅक्सीचा आग्रह धरला जात आहे. तरुणांसह तरुणीही अनधिकृत बाइक टॅक्सी सेवेत चालक म्हणून काम करतात. बाइक टॅक्सीचालकांचा आकडा साधारण एक लाखाहून अधिक असू शकेल, असा परिवहन विभागाचा अंदाज आहे.
हे आहेत धोके…
-सध्या धावत असलेल्या बाइक टॅक्सीचालकांकडून, तसेच कंपन्यांकडून प्रवासी सुरक्षेबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
-प्रवाशांना हेल्मेट देण्यात येत नाही, अनेक चालक बेदरकार दुचाकी चालवतात.
-अॅपवर दाखवलेल्या मार्गाऐवजी ‘शॉर्टकट’ने जातात. कंपनीकडून चालकांना विमा संरक्षणही मिळत नाही.
-चालकांची पोलिस पडताळणी झालेली नसते, महिला सुरक्षेसह आपत्कालीन यंत्रणेचाही अभाव.
मुंबईसह राज्यात पेट्रोलवर धावणाऱ्या बाइक टॅक्सीला परवानगी नाही. सध्या धावत असलेल्या अशा अनधिकृत बाइक टॅक्सींवर निश्चित कारवाई केली जात आहे. तत्पूर्वी यातील तांत्रिक आव्हाने सोडवण्यासाठी आज मंत्रालयात विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर कारवाईची रूपरेषा निश्चित करण्यात येणार आहे. – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
