• Sun. Jun 14th, 2026

    Sharad Pawar: सुनेत्रा पवारांनी पंख छाटताच प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या संपर्कात? सिल्व्हर ओकवर भेट घेतल्याची चर्चा

    Sharad Pawar: सुनेत्रा पवारांनी पंख छाटताच प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या संपर्कात? सिल्व्हर ओकवर भेट घेतल्याची चर्चा

    NCP Praful Patel: शरद पवार यांच्यासोबत झालेल्या कथित भेटीबाबत पुढील काही दिवसांत प्रफुल्ल पटेल हे नेमका काय खुलासा करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    सुनेत्रा पवारांनी पंख छाटताच प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या संपर्कात? सिल्व्हर ओकवर भेट घेतल्याची चर्चा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील काही दिवसांपासून वादळ निर्माण झाल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी २९ एप्रिलला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुधारित पदाधिकाऱ्यांची यादी पाठवण्यात येत असल्याचं म्हणत ही यादी अंतिम असेल असंही या पत्रात नमूद करण्यात आलं. या नव्या पत्रात फक्त सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष, तर शिवाजीराव गर्जेंचा कोषाध्यक्ष म्हणून उल्लेख करण्यात आला. तसंच राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून पार्थ पवार व जय पवारांना राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या यादीत प्रफुल्ल पटेल यांचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून उल्लेख केला नसल्याने त्यांना पदावरून हटवल्याची चर्चा रंगत आहे. तसंच सुनील तटकरे यांनाही दूर केल्याचे बोलले जात आहे. अशातच नुकतीच तटकरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतल्याचं उघड झालं. 12 मे रोजी पवार आणि तटकरे यांच्यात झालेल्या भेटीआधी प्रफुल्ल पटेल यांनी देखील सिल्व्हर ओकवर येऊन शरद पवारांची भेट घेतल्याचे वृत्त आता समोर आले आहे.

    एकीकडे पार्थ पवार यांच्यासोबतच्या मतभेदांमुळे राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे पंख छाटले जात असल्याची चर्चा असताना आता हे दोन्ही नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं समोर आल्याने दोन्ही राष्ट्रवादीच्या गोटात नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. तटकरे आणि पटेल हे आगामी निवडणूक भाजपकडून लढतील, असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार करत आहेत. प्रत्यक्षात मात्र हे दोन्ही नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं दिसत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

    आपण शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचं सुनील तटकरे यांनी यापूर्वीच सांगितलं आहे. मात्र पवार यांच्यासोबतच्या कथित भेटीवर अद्याप प्रफुल्ल पटेल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी ‘मटा ऑनलाइन’कडून पटेल यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

    दरम्यान, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रफुल पटेल यांच्यासह सुनील तटकरे यांना ठेवण्यात आलं असलं तरी त्यांच्या नावासमोर कुठल्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. २२ सदस्यीय कार्यकारिणीतही पार्थ पवार आणि जय पवारांचा समावेश आहे. या निर्णयामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची पक्षातील पदे काढून घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा