• Fri. Jul 3rd, 2026

    अधिकाऱ्यांनी लोकभिमुख प्रशासनाचे मॉडेल उभारावे – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 15, 2026
    अधिकाऱ्यांनी लोकभिमुख प्रशासनाचे मॉडेल उभारावे – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    मुंबई, दि. १५: महसूल विभागाने लोकाभिमुख होऊन काम करणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने शासकीय पदाचा लोकोपयोगी कामांसाठी उपयोग करुन गतिमान आणि पारदर्शक कामांचे नाविन्यपूर्ण मॉडेल सादर करावे, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

    मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत महसूल मंत्री बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाच्या कामाचा सर्वसमावेशक आढावा घेतला. कौशल्यविकास मंत्री तथा जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

    महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, महसूल हा नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण केले जाते. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने वेगवेगळ्या भागात पूर्वनियोजन करून स्वतःहून गेले पाहिजे. इज ऑफ डूईंगच्या अत्यावश्यक सेवा तातडीने दिल्या गेल्या पाहिजेत, तसेच त्यांच्याकडे आलेल्या प्रकरणांचा निपटारा देखील तातडीने झाला पाहिजे. स्थानिक समस्या त्याच पातळीवर सोडविल्या गेल्या पाहिजेत असे सांगून शासनापर्यंत येणाऱ्या तक्रारींची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    प्रशासनात नाविन्यपूर्ण आणि चांगले काम करणाऱ्यांचे कौतुकच होईल असे सांगून शासनामार्फत जिल्हा प्रशासनाच्या सर्व समस्या सोडविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. कोणत्याही कारणास्तव शासनाच्या जमिनींवर अटी शर्तींचा भंग होत असल्यास त्यावर कारवाई करुन जमीन शासन जमा करावी, असे निर्देशही मंत्री बावनकुळे यांनी दिले.

    जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचे सादरीकरण करुन माहिती दिली. यासह नोंदणी विभाग, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, मुद्रांक जिल्हाधिकारी आदी विभागांच्या कामांचा मंत्री बावनकुळे यांनी यावेळी आढावा घेतला. प्रलंबित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

    ००००

    बी.सी.झंवर/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed