Raj Thackeray and Sharad Pawar On Narendra Modi : मनसेप्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे
शरद पवार काय म्हणाले?
‘मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे’.
NCP Politics : पटेल-तटकरे vs पार्थ पवार; सुप्त संघर्षाच्या चर्चांदरम्यान प्रफुल पटेल राष्ट्रवादीतून पदच्युत, सुनेत्रांवर मध्यरात्री स्पष्टीकरण देण्याची वेळ
‘या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे’, असा सल्ला देत ठाम भूमिका शरद पवारांनी एक्सद्वारे मांडली आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
‘पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत. बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का?’.
Nashik News : युरियाचा काळाबाजार डोळे पांढरे करणारा! औद्योगिक कारणांसाठीचा वापर उजेडात; सबसिडी शेतकऱ्यांना, वापर मात्र भलतीकडेच
पुढे राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, ‘सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही. २००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात (जेव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी, असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले? त्याचं काय झालं?’, असा रोखठोक सवाल राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.
लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला
‘ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका ‘रेवड्या’ वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का?’
Maharashtra Weather: तापमानाने गाठला दहा वर्षांचा उच्चांक! पुन्हा पारा चाळिशीजवळ; तापमान वाढीचं नेमकं कारण काय?
‘पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेव्हा का नाही सुचलं? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं.’
थंड हवेच्या देशात जातात
‘गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशात जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा’.
NCP Politics: राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब
‘लालबहाद्दूर शास्त्रीजींनी पाकिस्तान युद्धाच्या वेळेस असंच आवाहन केलं होतं पण त्यात त्यांनी स्वतः ते कृतीत उतरवलं होतं. अशी कृती स्वतः पंतप्रधान करतील का? आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांकडून करून घेतील का? हे केलंत तर देश पण करेल. आणि तसाही पर्याय काय आहे? येत्या काळात सरकारला पेट्रोल डिझेलचे भाव दणदणीत वाढवायचे असणार त्याची पूर्वतयारी सुरु आहे. हे भाव वाढले की लोकं आपोआप न परवडल्यामुळे वापर कमी करणार आहेत.’
तीन गव्हर्नर्सनी राजीनामे का दिले?
‘माझी पंतप्रधानांना विनंती आहे की नैतिक आवाहन आणि त्याचा भार लोकांनी सहन करायचा हे सगळं बास झालं. एकदा मान्य करूया की अर्थव्यवस्था वरून सुदृढ आणि आतून कमकुवत झाली आहे आणि यांचं नुसतं खापर इराण-इस्रायल युद्धावर टाकू नका! आपण पंतप्रधान झाल्यापासून रूपयाचं अवमूल्यन मोठ्या प्रमाणात झालं, हे कशामूळे झालं ते सांगा! तुमच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात रिझर्व्ह बँकेच्या तीन गव्हर्नर्सनी राजीनामे दिले ते का दिले? मनमोहन सिंह हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते तसेच विद्वान होते तरीही ते अनेक तज्ज्ञांबरोबर बसून चर्चा करायचे, ऐकून घ्यायचे. आपण तर साधा व्यवसाय सुद्धा केलेला नाहीत तर आपल्याला हे कसं समजणार? तुमची मन की बात खूप झाली आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ज्ञांची मन की बात पण ऐका’.
Bird Flu In Maharashtra: चिकन प्रेमींनो सावधान! राज्यात बर्ड फ्लूचं थैमान, नंदुरबारमध्ये आतापर्यंत 4 लाख कोंबड्या, 21 हजार अंडी केली नष्ट
‘तुम्ही काय पाऊलं उचलणार आहात हे जनतेला सांगा. संसदेला सांगा. तसंही हवं तेव्हा विशेष अधिवेशन घेण्याची प्रथा पडली आहेच. त्यामुळे संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली आहे यावर सगळ्यांना उत्तर द्या. तुमच्या अनेक भूमिकांना आमचा विरोध होता आणि आहे. तसेच तुमच्या चांगल्या केलेल्या कामांचेही समर्थन केलेलं आहे परंतू आजच्या परिस्थितीत आमच्यासकट कोणीही तुमचे विरोधक नाही अथवा शत्रू नाही. असला आक्रस्ताळेपणा आमच्यात नाही. पण म्हणून प्रश्न विचारायचे नाहीत असं होणार नाही. ते आम्ही विचारणार. तेंव्हा पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरु करावी आणि हे सगळं कसं निस्तरणार हे देशाला सांगावं!’, अशी राज ठाकरेंनी आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट लिहिली आहे.
