• Sun. Jun 7th, 2026

    सिंधी समाजाचे सर्वच क्षेत्रात मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 10, 2026
    सिंधी समाजाचे सर्वच क्षेत्रात मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    नागपूर, दि. १०: निर्वासित म्हणून भारतात दाखल झालेल्या  सिंधी समाजाने शून्यापासून सुरुवात केली. आज देशाच्या व्यापार क्षेत्रासह सर्वच क्षेत्रामध्ये हा समाज आघाडीवर असून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.

    विदर्भ सिंधी विकास परिषदेच्या वतीने जरीपटका येथील महात्मा गांधी हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमात सिंधी बांधवांना मालकी पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. तसेच, समाजातील नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर भगवानदास सवनानी, आमदार कुमार आयलानी, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भारतीय सिंधू सभेचे राष्ट्रीय संरक्षक घनश्याम कुकरेजा, सिंधी विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनकी रूघवानी, संयोजक वीरेंद्र कुकरेजा, सचिव पि.टी. दारा आदी उपस्थित होते. यावेळी ३६ नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यापैकी १२ नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात करण्यात आला.

    मुख्यमंत्री पुढे म्हणाले, देशाच्या फाळणीनंतर या समाजाला घर, शेती, व्यापार सोडून विस्थापित होऊन भारतात यावे लागले. त्याचप्रमाणे अनेक वर्ष या समाज बांधवांना निर्वासितांच्या शिबिरामध्ये घालवावी लागली. समाजाने आपले दुःख हे  संघर्षाचे शस्त्र बनवले. आज हा समाज सर्व क्षेत्रात आघाडीवर असून देशाच्या विकासात अत्यंत मोलाचे योगदान देत आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सिंधी बांधवांना नागरिकत्व प्रदान करण्याचे देशभरात अभियान राबवले गेले. सिंधी बांधव वास्तव्यास असलेल्या जमिनी अतिक्रमण ठरत होत्या. त्यामुळे सिंधी बांधवांना मालकी पट्टे मिळावे, अशी मागणी सुरू होती. संधी मिळताच आम्ही या प्रश्नावर तोडगा काढला आणि सिंधी बांधवांना वर्ग एकच्या शंभर टक्के मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंधी बांधवांना मालकी हक्काचे पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

    आगामी काळातही अत्यंत वेगाने या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. तसेच उल्हासनगर येथील सिंधी बांधवांसाठी वेगळ्या पद्धतीने नियमितीकरण करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली.

    विनकी रुघवाणी यांनी प्रास्तविक केले. विकी कुकरेजा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

    ३५० सिंधी बांधवांना पट्टे वाटप

    भारताच्या फाळणीनंतर पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या सिंधी विस्थापितांचे नागपूर जिल्ह्यातील खामला, मेकोसाबाग व जरीपटका या भागात पुनर्वसन करण्यात आले. या तीन वसाहतींना अधिकृत विस्थापित वसाहतीचा दर्जा देण्यात आला. अनेक विस्थापित कुटुंबे मागील 70 -75 वर्षांपासून येथे वास्तव्यास असून त्यांनी नागपूरच्या आर्थिक, सामाजिक व व्यापारी विकासात मोठे योगदान दिले. आज 350 सिंधी बांधवांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारा जणांना प्रातिनिधिक स्वरूपात पट्टे वाटप करण्यात आले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed