• Sun. Jun 7th, 2026

    शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग; DCM च्या चॉपरला वादळाचा फटका, थोडक्यात अनर्थ टळला

    शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग; DCM च्या चॉपरला वादळाचा फटका, थोडक्यात अनर्थ टळला

    Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरनं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग केलं आहे. उपमुख्यमंत्री शिंदे मुरबाडला जात होते. पण त्यांचं हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेनं वळवण्यात आलं. जुहू विमानतळावर त्यांच्या हेलिकॉप्टरनं लँडिंग केलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टर ला वादळाचा फटका बसला आहे. सोसाट्याचा वारा आणि धुळीच्या वादळामुळे एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. एकनाथ शिंदे मुंबईहून मुरबाडला जात होते. एका लग्न सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री मुरबाडला निघाले होते. पण त्यांच्या हेलिकॉप्टरला वादळाचा तडाखा बसला. पायलटनं प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेनं वळवलं. जुहूतील विमानतळावर हेलिकॉप्टर लँड करण्यात आलं.

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरुन हेलिकॉप्टरनं निघाले होते. मुरबाडमध्ये एका लग्न सोहळ्यासाठी शिंदे हेलिकॉप्टरनं मुरबाडला निघाले. पण कल्याण परिसरातील धुळीच्या वादळाचा फटका शिंदेंच्या हेलिकॉप्टरला बसला. या कठीण प्रसंगात पायलटनं समयसूचकता दाखवली. हेलिकॉप्टर जवळपास १० ते १५ मिनिटं धुळीच्या वादळात अडकलं होतं. पायलटनं प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या दिशेनं वळवलं. जुहूतील विमानतळावर हेलिकॉप्टर सुरक्षित लँड झाले. शिंदे आणि त्यांच्या सोबत हेलिकॉप्टरमध्ये असलेले सगळे सुरक्षित आहेत. पायलटच्या प्रसंगावधानानं मोठा अनर्थ टळला आहे.

    कल्याण, डोंबिवलीत धुळीचं वादळ

    निसर्गामध्ये अचानक झालेल्या बदलांमुळे दिवा, डोंबिवली, कल्याण, मलंगगड परिसर आणि ग्रामीण भागात चारच्या सुमारास धुळीचे वादळ आलं. शहरावर पसरलेल्या धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावल्याचं बोलल जात आहे.असंच धुळीचं वादळ गेल्या वर्षीही आलं होतं.

    महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ वातावरण तसंच अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला होता. सद्य परिस्थिती पाहता तो खरा होताना दिसत आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लागली असून कल्याण, डोंबिवली, दिवा आणि आसपासच्या ग्रामीण परिसरात आज सकाळपासूनच वातावरणात उष्णता वाढली होती. त्यातच दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे ठाणे जिल्हातील काही शहर आणि ग्रामीण परिसरात काही काळ धुळीच्या चादरी आड झाकोळली गेली होती.

    जोरदार वाऱ्यांमुळे ठाणे जिल्ह्यातील काही शहरामध्ये रस्त्यांवर, इमारतींवर, झाडांवर साचलेली धूळ मोठ्या प्रमाणात हवेत उडाल्यानं काही काळ दृश्यमानता कमी झाली होती. दरम्यान, शहरावर पसरलेल्या या धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. परिणामी श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास झाला आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

    मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

    ‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

    टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

    लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

    लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

    २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

    शैक्षणिक पात्रता
    कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा