• Fri. Sep 11th, 2026

तंत्रज्ञानाच्या युगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपणे महत्त्व – योग संस्थेच्या संचालिका हंसाजी योगेंद्र – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 6, 2026
तंत्रज्ञानाच्या युगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपणे महत्त्व – योग संस्थेच्या संचालिका हंसाजी योगेंद्र – महासंवाद

मुंबई, दि. ६ : आज जग झपाट्याने तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असून नवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. मात्र, ही प्रगती साधताना आपले मन आणि शरीर सुदृढ आहे का, याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ माहिती ऐकणे पुरेसे नसून ती आत्मसात करण्यासाठी मनाची एकाग्रता आणि स्थिरता आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपणे अत्यंत महत्त्व असल्याचे योग संस्थेच्या संचालिका हंसाजी योगेंद्र यांनी सांगितले.

मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक वारी 2.0 – महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत ‘योगरंग – योगा फॉर अ हेल्दी लाइफ’ या सत्रात योग संस्थेच्या संचालिका हंसाजी योगेंद्र बोलत होत्या.

योगासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नसून तो दैनंदिन जीवनशैलीत रुजवला पाहिजे, असे सांगत संचालिका हंसाजी योगेंद्र यांनी काम करतानाही स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले. काम महत्त्वाचे आहे, पण स्वतःला विसरून काम करू नका. स्वतःची जाणीव ठेवूनच काम करा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

मानसिक तणाव आणि नकारात्मक विचार यांचा शरीरावर मोठा परिणाम होतो, असे सांगताना त्यांनी नमूद केले की, सुमारे ७० टक्के आजारांचे मूळ कारण चुकीची जीवनशैली आणि मानसिक असंतुलन आहे. त्यामुळे आत्मजाणीव आणि आत्मस्नेह या योगातील मूलभूत तत्त्वांचे पालन आवश्यक असल्याचे संचालिका हंसाजी योगेंद्र यांनी सांगितले.

राग, तणाव किंवा नकारात्मक परिस्थितीत त्वरित प्रतिक्रिया न देता थोडा विराम घेऊन विचारपूर्वक प्रतिसाद द्यावा, असे मार्गदर्शन करत त्यांनी ‘रिएक्शन’ ऐवजी ‘रिस्पॉन्स’ देण्याची सवय लावण्याचा सल्ला दिला. “काही क्षण थांबा, श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मग निर्णय घ्या,” असे त्या म्हणाल्या. तसेच, इतरांच्या बोलण्यामुळे किंवा वर्तनामुळे स्वतःला दुःखी न होऊ देणे, ‘लेट गो’ची वृत्ती अंगीकारणे आणि पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. योग हा केवळ व्यायाम नसून तो मनोविज्ञानाशी संबंधित विषय आहे, जो योग्य विचारसरणी विकसित करण्यास मदत करतो. तणावमुक्त, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी योगाचा अवलंब करावा, असेही संचालिका हंसाजी योगेंद्र यांनी सांगितले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, योग संस्थेचे सहायक संचालक ऋषी योगेंद्र, उपसचिव, कक्ष अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार उपसचिव लीना संखे यांनी मानले.

‘टेक-वारी 2.0’ मध्ये व्हर्च्युअल सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा.

००००

गजानन पाटील/स.सं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed