• Sun. Jun 7th, 2026

    Maharashtra Weather: वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार! राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये पावासाची शक्यता; विदर्भासाठी यलो अलर्ट जारी

    Maharashtra Weather: वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार! राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये पावासाची शक्यता; विदर्भासाठी यलो अलर्ट जारी

    Weather Alert: मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेची लाट येत असताना विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 7 जिल्ह्यांना यलो अलर्ट तर 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: महाराष्ट्रात मे महिन्यात हवामान सतत बदलत आहे. काही जिल्ह्यात नागरिक उष्णतेची लाट आणि उष्मघाताने त्रासले आहेत. तर इतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवारी, 4 मे रोजी, राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसासाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. राज्यात मेघगर्जनेसह 60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. कोकण, पुणे आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती कायम राहणार आहे.

    कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

    हवामान विभागाच्या अंदाजानुसार 4 मे रोजी, 11 जिल्ह्यांना पावसासाठी अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात येत्या 24 तासांत वादळी वारे वाहून त्यासह पावसाची शक्यता आहे.आयएमडीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर चार जिल्हे ऑरेंज अलर्टखाली आहेत. या भागांमध्ये पावसाची सर्वाधिक शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 50-60 किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून अनेक भागात वीज आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळसह अमरावती विभागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या प्रदेशातील तापमान सर्वाधिक असून कमाल तापमान 41 ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान असते. दरम्यान, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नागपूर विभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळ, वारे आणि वीजांसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अधिकाऱ्यांनी रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

    मुंबईत उष्णता कायम

    दरम्यान, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह कोकणात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहील. कमाल तापमान 33 अंश सेल्सियस ते 35 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहील आणि तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. दुपारच्या वेली उष्णता तीव्र राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या शहरांमध्ये दिवसाचे तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा