Pune Bhor Crime News : पुण्यातील भोर तालुक्यामध्ये घडलेल्या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीने गुन्ह्याची कबुली देत मोठा खुलासा केला आहे.
भर दुपारी मुलगी गायब
काल शुक्रवारी ज्यावेळी भर दुपारी ही चिमुकली गायब झाली, त्यावेळी सर्वांनी तपासाला सुरुवात केली. सर्वत्र तपास करुनही मुलगी न सापडल्यानं स्थानिकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. सीसीटीव्हीमध्ये मात्र संशयास्पद दृश्य आढळले आणि बघणाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सीसीटीव्हीमध्ये ही चिमुकली एका ६५ वर्षीय माणसासोबत गोठ्यात जाताना दिसत आहे. मात्र, ती पुन्हा बाहेर आलेली दिसलीच नाही.
चोप दिल्यानंतर केला धक्कादायक खुलासा
सीसीटीव्ही बघितल्यानंतर नागरिकांनी तातडीने तिच्यासोबत आत गेलेल्या आरोपीला शोधायला सुरुवात केली. घटनास्थळापासून ते गावच्या बाहेरपर्यंत नागरिकांनी पायाला भिंगरी लावत शोध घ्यायला सुरुवात केली. अखेर काही वेळाने हा आरोपी नागरिकांना सापडला. परंतु विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मात्र तो देत नव्हता. स्थानिकांनी मात्र कठोर भूमिका घेत आरोपीला चोप द्यायला सुरुवात केली आणि अखेर त्या नराधमाने त्यानं केलेलं विकृत कृत्य सांगायला सुरुवात केली. त्यातून मोठे खुलासे बाहेर यायला लागले. या कबुलीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. गावात संतापाची लाट उसळली. आरोपीने चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचं कबूल केलं आणि त्यानंतर पार्थिव कुठे लपवला आहे याची माहितीही दिली.
आरोपीच्या कबुलीनंतर ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. तिथे शेणाच्या ढिगाऱ्यात लपवलेला पार्थिव आढळून आला. ही माहिती समजताच गावात एकच आक्रोश उसळला. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. संध्याकाळी पार्थिव बाहेर काढल्यानंतर ग्रामस्थांचा राग अधिकच वाढला आणि त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन केलं. काही ठिकाणी रास्तारोकोही करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु
पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला तातडीने अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोक्सोसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा पूर्वीही गुन्हेगारी इतिहास असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या प्रवृत्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकरणामुळे नसरापूरसह संपूर्ण भोर तालुका हादरला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणीही जोर धरत आहे.
सात मे पर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान, आज या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये नेण्यात आले होते. त्यानंतर त्याला सात मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास पोलीस करत आहेत. आरोपीने दिलेल्या कबुलीनंतर आता मागील केलेले गुन्हे देखील बाहेर येण्याची शक्यता आहे, त्याचा देखील तपास सुरू आहे. या तपासांमध्ये नेमकं काय बाहेर येतं? आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जातेय का? या चिमुकलीला न्याय मिळतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
