• Sun. Sep 6th, 2026

कुंभ उद्योग संगम आणि नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांची पत्रकार परिषदेत माहिती – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 2, 2026
कुंभ उद्योग संगम आणि नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांची पत्रकार परिषदेत माहिती – महासंवाद

नाशिक, दि 2 मे (जिमाका वृत्तसेवा) : त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायाला चालना देण्यासाठी हॉटेल ताज, नाशिक येथे 6 मे 2026 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 या वेळेत कुंभ उद्योग संगम आणि नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट होणार आहे, अशी माहिती उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे आदी उपस्थित होते.

श्री. कुशवाह यांनी सांगितले की, राज्यात गुंतवणूक, उद्योग वाढीसाठी विविध प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी कुंभमेळा होत आहे. यात उद्योग, व्यावसायिकांना वेगवेगळ्या माध्यमातून सहभागी करून घेण्यात येईल. कुंभमेळ्यात उद्योगांचे नेहमीच योगदान राहिले आहे. हरित नाशिक, स्वच्छ नाशिकसह विविध उपक्रमांना उद्योगांचे सहकार्य राहिले आहे. आगामी कुंभमेळ्यात ही त्यांचे योगदान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्योग,  व्यावसायिकांना नाशिकमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. नाशिकमध्ये उपलब्ध पायाभूत सोयीसुविधा, दळणवळणाची साधने, महामार्ग यामुळे गुंतवणूकदार या भागाकडे आकर्षित होत आहेत. आतापर्यंत झालेले सामंजस्य करारातून विविध उद्योग, व्यवसाय उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.

या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी उद्योजक, व्यावसायिक, उद्योजकांच्या विविध संघटना यांच्याशी संवाद सुरू आहे. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या समिटच्या माध्यमातून काही नवीन सामंजस्य करार होतील. त्यांची माहिती ही माध्यमांना देण्यात येईल. कुंभ उद्योग संगम नाशिक डिस्ट्रिक्ट इन्व्हेस्टमेंट समिट मध्ये दिवसभर विविध विषयांवर चर्चा, परिसंवाद होईल, असेही उद्योग विकास आयुक्त श्री. कुशवाह यांनी सांगितले.

कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त श्री. सिंह यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्योग, व्यावसायिकांशी संवाद साधण्यात येत आहे. त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यावर मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, ही गुंतवणूक परिषद उद्योजक आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी महत्वाचा टप्पा असणार आहेत. भविष्यात नाशिक उद्योजक आणि गुंतवणूकदाराचे पहिल्या पसंतीचे इन्व्हेस्टमेंट डेस्टीनेशन ठरेल. अशी माहिती त्यांनी दिली.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed