• Mon. Sep 7th, 2026

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना आदिवासी विकास मंत्री यांची आदरांजली – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 2, 2026
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना आदिवासी विकास मंत्री यांची आदरांजली – महासंवाद

ठाणे, दि. 02 (जिमाका) : आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि त्यांच्या परिवाराचा गौरवशाली इतिहास आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून १०० टक्के प्रकाशित केला जाईल, तसेच हा प्रेरणादायी इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी आज येथे केले.

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या १८७ व्या स्मृती दिनानिमित्त ठाणे जिल्हा कारागृह प्रांगणात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी बोलताना मंत्री डॉ. वुईके म्हणाले की, राघोजी भांगरे यांनी समाजासाठी आणि देशहितासाठी दिलेले बलिदान विसरता येणारे नाही. विद्यार्थ्यांमध्ये क्रांतिकारकांच्या विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी शासनाने ‘राघोजी भांगरे शिष्यवृत्ती’ सुरू केली असून, प्रकल्प, विभाग आणि राज्य स्तरावर प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल. तसेच आगामी काळात आदिवासी विकास विभागाच्या विविध शासकीय योजनांना आणि आश्रमशाळांना आद्य क्रांतिकारकांचे नाव देऊन त्यांचा सन्मान केला जाईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ७२ आदिवासी महापुरुषांचा इतिहास संकलित करण्याचे काम सुरू असून, विद्यापीठ स्तरावर अध्यासन केंद्रांच्या माध्यमातून संशोधन करून पुस्तके प्रकाशित केली जात आहेत. पुढील वर्षीपासून हा कार्यक्रम अधिक मोठ्या प्रमाणावर शासकीय स्तरावर साजरा केला जाईल, जेणेकरून जनतेला कारागृहातील या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्याची संधी मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, राघोजी भांगरे यांनी जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी दिलेले योगदान इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी केवळ आदिवासी विकास विभागच नव्हे तर सर्वच विभागांनी पुढाकार घेणे, ही काळाची गरज आहे.

आमदार संजय केळकर यांनी ठाणे कारागृहाची भूमी क्रांतिकारकांच्या बलिदानाने पावन झाली असल्याचे सांगून सावरकरांपासून राघोजी भांगरे यांच्यापर्यंतचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी राघोजी भांगरे यांच्याबद्दलच्या प्रेरणादायी आठवणींना उजाळा दिला. वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी देशासाठी फासावर जाणारे राघोजी भांगरे ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यातील अग्रदूत होते, असे सांगत त्यांच्या स्मारकासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका मांडली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या कार्यक्रमास आमदार निरंजन डावखरे, आदिवासी विकास अपर आयुक्त गोपीचंद कदम, उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील, ठाणे जिल्हा कारागृह अधीक्षक राणी भोसले, ठाणे महानगरपालिका उपमहापौर कृष्णा पाटील, सहाय्यक आयुक्त श्री.शिर्के, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे, जिल्हा विधी समिती प्रमुख रंजना राजगोर, प्रा.विलास गवारी, सहाय्यक लेखाधिकारी विजय कोरडे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिवाकर काळपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अशोक ईरणक यांनी मानले.

0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed