• Sat. Jun 6th, 2026

    Bageshwar Baba Apologize : शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, राज्यभरात संताप, अखेर बागेश्वर बाबांचा माफीनामा

    Bageshwar Baba Apologize : शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, राज्यभरात संताप, अखेर बागेश्वर बाबांचा माफीनामा

    बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. त्यांच्या वक्तव्यावरुन राजकारण देखील तापलं होतं. अखेर वाद वाढत गेल्याने बागेश्वर बाबा यांना आपल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी लागली आहे. आपल्या बोलण्याचा अर्थ वेगळा होता, पण आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असंदेखील बागेश्वर बाबा यांनी स्पष्ट केलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बागेश्वर धामचे पीठासीन बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्र हे वादात सापडले आहेत. “छत्रपती शिवाजी महाराज हे युद्ध लढून थकले आणि त्यांनी आपलं मुकूट रामदास स्वामी यांच्याजवळ ठेवलं. आपण आता थकलो असून हा राजपाट सांभाळा, असं शिवाजी महाराज रामदास स्वामींना म्हणाले. त्यावर रामदास स्वामी यांनी गुरु कोण आणि शिष्ट कोण? असा प्रश्न विचारला. त्यावर शिवाजी महाराजांनी आपण गुरु आणि मी शिष्य असल्याचं रामदास स्वामींना म्हटलं. यानंतर रामदास स्वामी यांनी आतापासून हे राज्य आपलं असून तु्म्ही या राज्याचा कार्यभार सांभाळावा असा मी आदेश देतो, असं रामदास स्वामी शिवाजी महाराजांना म्हणाले”, असं वादग्रस्त वक्तव्य बागेश्वर बाबा यांनी नागपुरात कार्यक्रमात केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. त्यामुले अखेर आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत बागेश्वर बाबा यांनी माफी मागितली आहे.

    “मी परवा नागपुरात आलो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारत दुर्गामाता मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला जाण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. सोशल मीडियावर कालपासून काही लोकांनी आमच्या वक्त्याला वेगळ्या पद्धतीने दाखवलं. ज्यांना वाचून आणि ज्यांना जाणून आम्ही या भूमीवर आलो, ज्यांच्या स्वराज्य स्थापनेचा विचार वाचून आम्ही हिंदूराष्ट्राचा संकल्प केला. आम्हाला दोष देण्यात आला की, आम्ही त्यांचा अवमान केला. यामुळे आमच्या मनात खूप दु:ख आणि खेद आहे”, अशी भावना बागेश्वर बाबांनी व्यक्त केली.

    “ज्यांची हिंदवी स्वराज्याची स्थापना वाचून मी हिंदूराष्ट्राचा संकल्प केला, आम्ही त्यांचा अपमान करणं ही तर फार दूरची गोष्ट आहे, कुणी स्वप्नातही त्यांची निंदा करतील तर आम्ही ऐकून घेऊ शकणार नाहीत. आम्हीच काय तर या देशाचा प्रत्येक सनातनी आज जिवंत आहे, हिंदूत्वासाठी तो सजग आहे तर त्याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे”, असं ते म्हणाले.

    “आम्हाला दु:ख आहे की, जे छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकतात मग ते छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेडचे लोकं असतील किंवा मराठा साम्राज्यात जीवन जगणारे मराठे असतील, ते आमचेच लोक आहेत. आम्ही सर्व शिवाजी महाराजांचे लोक आहोत. आम्ही आपापसात वाद घालू तर दुसऱ्यांना त्याचा फायदा होईल. आमचा एक टक्केदेखील तसा विचार नव्हता. शिवाजी महाराज गुरुमहिमाप्रती समर्पित होते ते सांगण्याचा उद्देश होता”, असं बागेश्वर बाबांनी स्पष्ट केलं.

    “आमच्या देशचे राजा, आमच्या देशाचे हिंदूहृदयसम्राट, हिंदूंचे सम्राट छत्रपती वीर शिवाजी महाराज संत, महंत, आई तुळजाभवानीला किती मानायचे ते मला सांगायचं होतं. ती भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न मी माझ्या भाषेतून सांगत होतो. या भाषेच्या अर्थाचा अनर्थ करुन काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने दाखवलं. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. कुणाला माझ्या वक्तव्याने त्रास झाला असेल किंवा कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून माफी मागतो”, अशा शब्दांत बागेश्वर बाबा यांनी माफी मागितली.

    “पण एक गोष्ट आहे, आमच्या म्हणण्याला चुकीच्या पद्धतीने दाखवलं जाऊ नये. कारण मी आम्ही शिवाजी महाराजांसाठी जगतो आणि मरतो देखील शिवाजी महाराजांसाठी. आमचे जीवनही त्यांच्या स्वराज्यासाठी आहे. हिंदूराष्ट्रची कल्पना आणि विचारधारा ही त्यांच्यापासूनच घेतली आहे. मग मी त्यांची शब्दांतून अवहेलना कशी करु शकतो?”, अशी भूमिका बागेश्वर बाबांनी मांडली.

    देशाची प्रगती कशी होणार?

    “देशाची प्रगती आणि समृद्धी धर्माच्या नावाने होणार नाही. धार्मिक व्यवस्था जीवन जगण्यासाठी महत्त्वाचं आहे. पण देशाची प्रगती ही आर्थिकतेने होईल. आर्थिक आवश्यकतांमुळेच देशाची प्रगती होईल. देशाची प्रगती विकासाने होईल. देशाची प्रगती शिक्षण, आरोग्य हे मोफत झाल्याने होईल. तर दारु आणि व्यसानाचे पदार्थ मिळणे कठीण झाले तर देशाची प्रगती होईल”, असं बागेश्वर बाबा म्हणाले.

    “राष्ट्रीय स्वयंसेवकाचा अर्थ म्हणजे राष्ट्रीय विचारधारा. संघाचा अर्थ म्हणजे देशाच्या सैन्यात जाणं. मग ते तीनही सैन्यदल. राष्ट्रीय विचारधारा म्हणजे सनातनचा प्रचार करणं, संत स्वभावात जगणं. राष्ट्रीयताचा अर्थ आहे की, आमच्या विचारांचा प्रचार प्रसार करणं. जसे की, ठिकठिकाणी जावून जगद्गुरु संत नामदेव, जगद्गुरु संत तुकाराम यांनी अभंग गात प्रचार केला. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रचार केला. राष्ट्रीयताचा अर्थ हा आहे. राष्ट्रीयता म्हणजे केवळ संघाचा प्रचारक बनणं नाहीय. राष्ट्रीयता म्हणजे देशासाठी जगावं. हे आमचं उद्दीष्ट आहे”, असंदेखील बागेश्वर बाबा यांनी स्पष्ट केलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा