Aapli Bus, Aapli Seva: महाराष्ट्रातील प्रतिष्ठित लालपरीच्या सेवेत 1 मेपासून मोठा बदल होणार आहे. 1 मे 2026पासून ‘आपली बस, आपली सेवा’ या नावाने राज्यव्यापी मोहीम सुरू होणार आहे.
मुंबई: राज्याच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेली एसटी सेवा अधिक प्रवासी-केंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने “आपली बस, आपली सेवा” हे अभियान जाहीर केले आहे. 1 मेपासून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस ताफ्यात वाढ होऊनही प्रवासीसंख्या आणि महसूल अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा विश्वास पुन्हा मिळवणे आणि सेवेची गुणवत्ता उंचावणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
Mumbai-Ahmedabad Bullet Train: ‘बुलेट ट्रेन’साठी रुळ बसवण्याचा कामाला वेग, पहिल्यांदाच जपानी प्रणालीचा वापर; मुंबईत भुयारी बुलेट स्थानक
सेवेचा नवा दृष्टिकोन
या उपक्रमांतर्गत चालक आणि वाहक यांच्या भूमिकेत बदल करण्यात येणार असून, त्यांच्याकडून अधिक जबाबदार आणि प्रवासी-अनुकूल वर्तनाची अपेक्षा ठेवण्यात आली आहे. बसची नियमित स्वच्छता, वेळेचे काटेकोर पालन, गणवेशातील नीटनेटकेपणा आणि शिस्त यावर विशेष भर असेल. प्रत्येक प्रवासाच्या सुरुवातीला चालकाने स्वतःची ओळख करून देत मार्ग, थांबे आणि अपेक्षित वेळ याची माहिती प्रवाशांना देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे संवाद वाढून प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.
प्रवाशांचीही जबाबदारी
या अभियानात प्रवाशांचाही सहभाग महत्त्वाचा मानण्यात आला आहे. स्वच्छता राखणे, सामानाची जबाबदारी घेणे आणि प्रवासादरम्यान शिस्त पाळणे, या बाबींमुळे एकूण अनुभव अधिक चांगला होईल. तसेच डिजिटल सेवांचा वापर वाढवण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड आणि ऑनलाइन आरक्षणाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
अडचणींवर तातडीने तोडगा
बस रद्द होणे किंवा मार्गात अडथळे निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था त्वरीत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बसस्थानके स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवण्यावरही भर देण्यात येणार आहे. यामुळे अधिकाधिक नागरिक एसटी सेवेचा वापर करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Mumbai Metro 6: पूर्व ते पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडणार मेट्रो! रेल्वे रुळ ओलांडून मेट्रो 6चा मार्ग; कोणत्या स्थानकांचा समावेश?
तक्रार निवारणावर भर
प्रवाशांच्या तक्रारींचे जलद निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. नियमित आढाव्याद्वारे सेवेतील त्रुटी ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील.
विश्वास पुनर्स्थापनेचा प्रयत्न
1 मेपासून महाराष्ट्रात सुरू होणारे हे अभियान केवळ प्रशासकीय बदलांपुरते मर्यादित नसून, एसटी आणि प्रवासी यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आहे. सेवा अधिक विश्वासार्ह, सुलभ आणि सन्मानजनक करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा