• Sat. Jun 6th, 2026
    Maharashtra Weather: उन्हाच्या काहिलीचा कहर! राज्यात आजही उष्णतेच्या झळा कायम राहण्याचा IMDचा अंदाज

    Maharashtra Weather Update 25 April 2026: ​​मुंबईच्या तुलनेत ठाणे, पालघर जिल्ह्यांत तापमान अधिक असते. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या दोन जिल्ह्यांतील अनेक भागांत ४० अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाली.

    महाराष्ट्र तापमान(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून महामुंबई परिसरात तर पाऱ्याने चाळिशी पार केली आहे. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, कर्जत परिसरात शुक्रवारी ४१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईकरही उष्णतेने हैराण झाले. येथे तुरळक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांवर पोहोचला होता. सांताक्रूझ येथे ३५.६, तर कुलाबा येथे ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. उष्णतेची तीव्रता आज, शनिवारीही कायम राहील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    मुंबईत वातावरणामध्ये उष्णता साचून राहिल्याने नागरिकांना अस्वस्थता जाणवत होती. येथे किमान तापमानाचा पाराही चढा होता. कुलाबा येथे २६.५, सांताक्रूझ येथे २६.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले आहे. सांताक्रूझ येथील किमान तापमान सरासरीपेक्षा १.२ अंशांनी अधिक असल्याचे निदर्शनास आले.

    कर्जत, मुरबाड, कल्याण, डोंबिवली, भिवंडी आदी परिसरात उष्णतेचा पारा अधिक आहे. गुरुवारी कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, कर्जत परिसरात ४३ अंश कमाल तापमानाची नोंद झाली होती. शुक्रवारी यापेक्षा किंचित कमी तापमान नोंदवण्यात आले. आज, शनिवारी पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.

    Maharashtra TimesCentral Railway Megablock: मध्य रेल्वेवर आज 15 तासांचा ब्लॉक! आसनगाव–कसारा दरम्यान लोकल ठप्प; मेल-एक्स्प्रेसवर परिणाम
    नाशिकमध्ये विक्रमी किमान तापमान
    नाशिक : नाशिक जिल्ह्यात हंगामातील विक्रमी किमान तापमानाची शुक्रवारी नोंद झाली. हे तापमान २४.३ अंश सेल्सियस नोंदविले गेले. गारवा गायब झाल्याचा आणि सकाळपासूनच उकाडा जाणवत असल्याचा प्रत्यय नाशिककरांना येत आहे. कमाल तापमानही ३९.६ अंश सेल्सियस नोंदविले गेले. जळगावचे तापमान ४३.३ अंशांवर पोहोचले असून, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरचे तापमान ४१.६ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले आहे.

    जळगावात उष्माघाताने मृत्यू

    जळगाव : जळगाव जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा ४२.८ अंशांपर्यंत पोहोचला आहे. ही होरपळ आता कष्टकऱ्यांच्या जिवावर बेतू लागली आहे. रावेर शहरातील एका बांधकाम कामगाराचा गुरुवारी मध्यरात्री मृत्यू झाला असून, उष्माघातामुळे त्याचा बळी गेल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी वर्तवला आहे. योगेश सुधाकर महाजन असे या कामगाराचे नाव आहे.

    Maharashtra TimesMarathi Compulsion : दहिसरमध्ये मनसे-शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर, संजय निरुपम यांच्या गाडीच्या टायरची हवा काढली
    कोकणालाही झळा
    मुंबईसोबतच कोकण विभागातील कमाल तापमानाचा पारा चढा आहे. रत्नागिरी येथे ३६.३, तर डहाणू येथे ३५.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान शुक्रवारी नोंदले गेले. उष्णता निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, कोकण किनारपट्टीवर, तसेच मुंबईतील कमाल तापमानाची जाणीव ही ४० अंशांच्या पार होती, असे दिसले. महाराष्ट्राच्या अंतर्भागात तुरळक ठिकाणी कमाल तापमानाची जाणीव ही ४० अंशांहून कमी होती, अशीही नोंद झाली. परंतु विदर्भ, कोकण किनारपट्टी येथे मात्र ही जाणीव अधिक तीव्र असल्याचे निदर्शनास आले.

    मुंबईतील शुक्रवारचे कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
    राममंदिर : ३६.८
    विक्रोळी : ३६.६
    विद्याविहार : ३५.९
    चेंबूर : ३५.४
    वांद्रे आणि दहिसर : ३५.१

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा