Pune Accident: पुण्यातील वनाज चौकात आज पीएमपीएल बसचा भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने बसने कचरा गाडीला जोरदार धडक दिली. यात एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे: पुणे शहरात पीएमपीएल बसच्या अपघातांच्या घटनांनी पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवली आहे. दोन दिवसांपूर्वी एबीसी चौकात घडलेल्या घटनेनंतर आता वनाज चौकात झालेल्या भीषण अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग घडणाऱ्या ब्रेक फेल घटनांमुळे पीएमपीएल बसच्या सुरक्षिततेवर आणि देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दोन दिवसांपूर्वीच अपघात
दोन दिवसांपूर्वी एबीसी चौक परिसरात पीएमपीएल बसचा ब्रेक अचानक फेल झाला होता. त्या वेळी बस थेट एका लग्न पत्रिका विक्री करणाऱ्या दुकानात घुसली होती. या अपघातात दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली होती, मात्र या घटनेनंतर प्रशासनाने बस चालकावर निलंबनाची कारवाई केली होती.मात्र, ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा वनाज चौकात आणखी एक भीषण अपघात घडला आहे. ब्रेक फेल झाल्याने पीएमपीएल बसने समोर उभ्या असलेल्या कचरा संकलन वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीवर काम करणारा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पुन्हा एकदा अपघात
या अपघातानंतर काही काळ परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमीला रुग्णालयात हलवले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस अचानक वेगात आली आणि काही क्षणातच हा अपघात घडला. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. “बस सुरक्षित आहेत का?” आणि “नियमित तपासणी योग्य प्रकारे होते का?” असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. पीएमपीएल बसच्या तांत्रिक देखभाल आणि दुरुस्ती व्यवस्थेवरही आता गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.
दरम्यान, प्रशासनाकडून या दोन्ही घटनांचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. तांत्रिक बिघाड, देखभाल प्रक्रिया आणि सुरक्षा तपासणी याबाबत माहिती घेतली जात आहे. मात्र, सलग घडणाऱ्या अशा अपघातांमुळे पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा