• Sun. Jul 5th, 2026

    आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेतून सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षण – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 24, 2026
    आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेतून सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षण – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

     

    • योजनेंतर्गत २३९९ आजारांवर उपचार
    •  जिल्ह्यात ८७ खाजगी रूग्णालयांसह १८४ अंगिकृत रूग्णालये 
    • ग्रामस्तरापर्यंत जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश

     सांगली, दि. २४ (जिमाका) : महाराष्ट्र शासनाने महत्त्वाकांक्षी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षण देण्यात येत आहे. या योजनेतून राज्यातील जनतेला उत्तम व मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध होत असून, वैद्यकीय खर्च शून्यावर येण्यासाठी मदत होत आहे. त्यामुळे या योजनेच्या प्रचार प्रसिद्धी व्यापक जनजागृती मोहीम सुरू करावी. कोणताही पात्र व गरजू रूग्ण उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

    जिल्हास्तरीय पालक जनआरोग्य संरक्षण कार्यकारिणीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त राहुल रोकडे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, शासकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील आदि उपस्थित होते.

    लाभार्थ्यांना या आरोग्य योजनांचा जास्तीत जास्त फायदा मिळावा, यासाठी प्रचार-प्रसार वाढविण्याच्या सूचना करून पालकमंत्री म्हणाले, एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना संपूर्णपणे कागदविरहित आणि संगणक प्रणालीद्वारे राबवली जाते. या योजनेमधून प्रति वर्ष पाच लाख रूपयांचे आरोग्य संरक्षण कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य वापरू शकतात. योजनेंतर्गत २३९९ आजारांवर उपचार केले जातात. यामध्ये ८७ खाजगी रूग्णालयांसह १८४ अंगिकृत रूग्णालयांमध्ये उपचार केले जातात. ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांना लागू आहे. आता सर्व ग्रामीण आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे या योजनेंतर्गत समाविष्ट केली जात आहेत, ज्यामुळे गरीबांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनांचा जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ होऊन, त्यांना आरोग्य संरक्षण मिळावे, यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सूचित केले.

     

    पात्र व गरजू रूग्णांना उपचार मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने सतर्कतेने काम करावे, असे स्पष्ट करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती अधिक सक्रिय ठेवावी. रुग्णालयांनी लाभार्थ्यांशी संवेदनशीलतेने वागावे आणि उपचार प्रक्रियेत पारदर्शकता राखावी. योजनांचा व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी ग्रामस्तरापर्यंत जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश देताना, प्रत्येक पात्र नागरिकाला योजनेचा लाभ मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून यासाठी तालुका स्तरावर वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्याबाबत तसेच आयुष्मान कार्ड काढण्याची मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, या योजनेच्या व्यापक प्रचार प्रसिद्धीसाठी सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयात प्रसिद्धीफलक प्रदर्शित करावेत.

    यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी या योजनेच्या सांगली जिल्ह्यातील अंमलबजावणीचा आढावा सादर केला. ते म्हणाले, जिल्ह्यात १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत एकूण सुमारे २७ हजार ४७७ रूग्णांनी योजनेचा लाभ घेता असून, त्यापोटी १३७ कोटी रूपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. योजनेमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये आतापर्यंत २४३६० रुग्णांवर उपचार करण्यात आला असून त्यापोटी त्यांना ४९ कोटी अनुदान वितरित करण्यात आले आहे. जिल्हा सनियंत्रण समितीच्या गत वर्षभरात ७ बैठका घेण्यात आल्या. एकूण १३६ पैकी ११९ तक्रारी निकाली काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

     

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed