• Sun. Jul 5th, 2026

    गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरित पूर्ण करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 23, 2026
    गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरित पूर्ण करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    मुंबई, दि. २३ : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरित पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

    सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार नरेंद्र भोंडेकर, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते तर जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी, गोसीखुर्द मुख्य अभियंता दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

    यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटनाच्या कामाचा आढावा घेतला. टप्पा एक मध्ये सुरू असलेल्या जेट्टीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. दुसरा टप्प्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन शासनाकडे त्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या.

    यावेळी नागपूर ते भंडारा रोड या दरम्यान धावणाऱ्या ब्रॉडगेज मेट्रोबाबतही चर्चा करण्यात आली. ही मेट्रो सेवा भंडारा शहरापर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी आमदार भोंडेकर यांनी केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबधित अधिकाऱ्यांना महारेल, रेल्वे बोर्ड यांच्याकडे पाठपुरावा करण्याबाबत निर्देश दिले. मेट्रो सेवा भंडारा शहरापर्यंत नेल्यास त्याचा फायदा जिल्ह्याला होईल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed