Mumbai Mayor: मोर्चामुळे झालेल्या गैरसोयबद्दल नागरिकांची दिलगिरी व्यक्त करत असतानाच महापौर रितू तावडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
मुंबईत भाजपच्या मोर्चात महिलेचा राडा; महापौरांकडून नागरिकांची दिलगिरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: नारीशक्ती वंदन विधेयकाला संसदेत विरोध केल्यामुळे भाजपने इंडिया आघाडीतील पक्षांविरोधात मुंबईतील वरळी इथं मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र हा मोर्चा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला. भाजपच्या या मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाल्यामुळे एका संतप्त महिलेने भाजप नेत्यांसह पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत गोंधळ घातला. या घटनेमुळे राजकीय आंदोलने आणि त्यामुळे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी, हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसंच या मोर्चासाठी भाजपकडून रीतसर परवानगी घेण्यात आली होती की नव्हती, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी खुलासा करत नागरिकांना झालेल्या गैरसोयबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
वरळीतील आंदोलनाविषयी भूमिका मांडता रितू तावडे यांनी म्हटलं की,”काल वरळी येथे आयोजित महिलांचा जनआक्रोश मोर्चा हा पूर्णपणे पूर्वनियोजित असून या मोर्चासाठी सर्व आवश्यक परवानग्या घेतल्यानंतरच हा मोर्चा काढण्यात आला होता. नागरिक व वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस आणि वाहतूक विभागाकडून योग्य नियोजन देखील करण्यात आले होते. परंतु तरीही काही नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल मुंबईची प्रथम सेविका म्हणून मी दिलगिरी व्यक्त करते,” असं तावडे यांनी म्हटलं आहे.
विरोधकांना इशारा
“मी स्पष्ट सांगते की नारीशक्ती वंदन अधिनियम सुधारणा विधेयकाच्या विरोधाच्या माध्यमातून महिलांच्या राजकीय हक्कांवर गदा आणणाऱ्यांविरोधात हा आमचा ठाम आणि योग्य लढा आहे. महिलांना समान हक्क व राजकीय प्रतिनिधित्व नाकारण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नाही. तप्त उन्हात राज्यभरातून हजारो महिला या मोर्चात सहभागी झाल्या, कारण हे केवळ आंदोलन नव्हतं, तर हा महिलांच्या हक्कांचा आक्रोश होता. त्यामुळे मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक भगिनीचा आणि आमचा रोष ‘ती’ भगिनी व सर्व नागरिक समजून घेतील, अशी माफक अपेक्षा व्यक्त करते,” अशी भूमिका रितू तावडे यांनी मांडली.
दरम्यान, “आमच्या महायुती शासनाच्या प्रयत्नातून साकारलेले धर्मवीर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड, सिंदूर रेल्वे उड्डाणपूल आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रेल्वे उड्डाणपूल यासह विविध पूल व सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते या तून दक्षिण मुंबईतील दैनंदिन वाहतूक पूर्वीपेक्षा नक्कीच सुलभ झाली आहे. आमच्या कामाची दखल घेण्याऐवजी महिलांच्या हक्कांवर घाला घालणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, हेच योग्य ठरेल,” असा टोलाही रितू तावडे यांनी विरोधकांना लगावला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा