Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवडमध्ये सांगवी-बोपोडी पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या दिलीप तनपुरे यांच्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. व्हॉट्सॲप ग्रुपवरील पोस्टवरून झालेल्या या वादात पोलिसांनी दोघांना अटक केली असून तीन आरोपी फरार आहेत.
पिंपरी चिंचवड क्राइम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड शहरात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तक्रारदारावर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून स्थानिक राजकारणातही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिकेकडून सांगवी ते बोपोडी या परिसरांना जोडण्यासाठी सुमारे 32 कोटी रुपयांचा पूल उभारण्यात आला आहे. याशिवाय या पुलाच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 19 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. या कामाच्या खर्चाबाबत आणि गुणवत्तेबाबत सांगवी परिसरातील ‘काँग्रेच्युलेशन’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर तक्रारदार दिलीप मारुतीराव तनपुरे यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी या प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधितांकडून स्पष्टीकरणाची मागणी केली होती.
दुचाकी अडवून हल्ला
याच कारणावरून राग मनात धरत काही जणांनी तनपुरे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास माकन चौक परिसरात ही घटना घडली. दिलीप तनपुरे हे दुचाकीवरून जात असताना काही आरोपींनी त्यांना अडवून लोखंडी रॉड आणि चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तनपुरे गंभीर जखमी झाले असून सुदैवाने ते थोडक्यात बचावले आहेत. तत्काळ त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गुन्हा दाखल, आरोपी फरार
तक्रारदार तनपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हे स्थानिक भाजप नेत्याचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अभिषेक नारायण शेगडे आणि अंकीतकुमार उर्फ कल्लू राजेश मोर्या या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर ओम गणपत ताकवणे, ओम आणि नैतिक हे तीन संशयित फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
Pune Crime: पुण्यातील भिडे पुलाजवळ तरुणाची बॉडी आढळली; दगडाने ठेचून संपवल्याचा संशय, नेमकं काय घडलं?
हल्ल्यापूर्वी इशारा
विशेष म्हणजे, हल्ल्यापूर्वी तक्रारदार दिलीप तनपुरे यांना व्हॉट्सअॅपवरून इशारा देणारी एक पोस्ट पाठवण्यात आली होती. “तुम्ही विरोध करा, आम्ही विरोध केला तर सहन करा,” असा मजकूर त्या पोस्टमध्ये होता, असे तपासात समोर आले आहे. या धमकीनंतरही तनपुरे यांनी आपले प्रश्न कायम ठेवले होते.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे शहरात सुरक्षिततेबाबत आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्यांच्या संरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा