• Mon. Jun 15th, 2026

    Mumbai Local: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, गर्दी गायब होणार; CSMT ते कल्याण आणि चर्चगटपासून विरारपर्यंत थेट भुयारी लोकलसाठी हालचाली

    Mumbai Local: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, गर्दी गायब होणार; CSMT ते कल्याण आणि चर्चगटपासून विरारपर्यंत थेट भुयारी लोकलसाठी हालचाली

    Mumbai Train News: रुळांवर शून्य मृत्यू, प्रवासी सुरक्षितता, लोकल, मेल-एक्स्प्रेस आणि मालगाड्या यांच्यासाठी स्वतंत्र मार्ग उभारणीसाठी मुंबई उपनगरी रेल्वे भुयारी मार्गाने चालवता येईल का, यासाठी ही व्यवहार्यता चाचणी करण्यात येणार आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

    मुंबई CSMT(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    महेश चेमटे, मुंबई : वाढत्या गर्दीच्या विभाजनाच्या दृष्टीने मुंबई उपनगरी रेल्वेच्या मार्गबदलासाठी नव्या पर्यायांची चाचपणी सुरू झाली आहे. ही उपनगरी रेल्वे भुयारी मार्गाद्वारे सुरू करण्याचे संकेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि चर्चगेट ते विरारदरम्यान प्रकल्प राबवण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने पावले टाकली आहेत. त्याची व्यवहार्यता तपासणी सुरू केली आहे.

    चर्चगेट ते विरारदरम्यान भुयारी उपनगरी रेल्वे चालवण्यासाठी व्यवहार्यता अभ्यास करण्याची परवानगी पश्चिम रेल्वेने मंडळाकडे मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणसाठी मध्य रेल्वेकडून विचारणा करण्यात येत आहे. शहरात जमिनीची मोठी मर्यादा आहे. त्यातच जमिनीवरील अतिक्रमणे हटवणे व बाधितांचे पुनर्वसन करणे या बाबी खर्चिक आणि वेळखाऊ आहेत. मुंबईत केवळ जागेअभावी वर्षानुवर्षे प्रकल्प रखडले आहेत. यामुळे नव्या रेल्वे मार्गिका उभारणीसाठी भुयारी मार्गाचा पर्याय उपलब्ध आहे. रेल्वे अपघातांत रुळ ओलांडून मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्राण जातात, तसेच रेल्वेच्या वक्तशीरपणावरही परिणाम होतो. रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांतील गर्दी विभागण्यासाठी नियंत्रित प्रवासी प्रवेश राबवणे भुयारी मार्गामुळे सहज शक्य होईल.

    चर्चगेट ते डहाणूदरम्यान रोज ३० लाख प्रवासी, तर ‘सीएसएमटी’ ते कसारा/कर्जतदरम्यान ३८ लाख प्रवासी प्रवास करतात. यामुळे व्यवहार्यतेत प्रवासी वर्दळ नियोजनाचा समावेश असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कोंडीवर उपाय सुचवत जलद प्रवासासाठी भुयारी रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याची घोषणा केली आहे. येत्या पाच वर्षांत मुंबई पूर्व-पश्चिम जोडणी (१० किमी), उत्तर-दक्षिण जोडणी (४४ किमी), वरळी सी-लिंक ते विमानतळ (१६ किमी) अशा एकूण ७० किमीचा भुयारी रस्ता निर्माण करण्याचे नियोजन आहे.

    ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळाने चर्चगेट ते मुंबई सेंट्रल भुयारी रेल्वे मार्गाच्या तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यतेचा अभ्यास सुरू केला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकार आणि राज्य सरकार घेणार आहे,’ असे ‘एमआरव्हीसी’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी सांगितले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात विशेषतः मुंबईतील मार्ग भुयारी असून त्याचे खोदकाम जुलैपासून सुरू होईल. शहरात कफ परेड ते आरे मुंबई मेट्रो ३ हा ३३ किमीचा भुयारी मार्ग उभारण्यात आला. त्यातून यशस्वीपणे प्रवासी वाहतूक सुरू आहे. येत्या काही काळात मेट्रो ७ अ, ८, ११ यांतून आणखी ३३ किमी मेट्रो जाळे कार्यान्वित होणार आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा