• Sun. Jun 7th, 2026

    Chhatrapati Sambhajinagar Crime: गोळीबार करणाऱ्या ‘पीडी कंपनी’ची मस्ती जिरवली; ज्या चौकात दहशत माजवली तिथेच पोलिसांनी धिंड काढली, 8 आरोपींना भरबाजारातून फिरवलं!

    Chhatrapati Sambhajinagar Crime: गोळीबार करणाऱ्या ‘पीडी कंपनी’ची मस्ती जिरवली; ज्या चौकात दहशत माजवली तिथेच पोलिसांनी धिंड काढली, 8 आरोपींना भरबाजारातून फिरवलं!

    Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये दहशत माजवणारा कुख्यात पवन दिवेकर आणि त्याच्या टोळीची पोलिसांनी पुंडलिकनगर परिसरात भरबाजारात धिंड काढली. गोळीबार करून पळून जाणाऱ्या आणि पोलिसांवर चाकू उगारणाऱ्या या गुंडांना पोलिसांनी ‘लाईव्ह धडा’ शिकवला असून शहरात याची मोठी चर्चा आहे.

    पुंडलिकनगर गोळीबार प्रकरण ८ आरोपींना अटक, पोलिसांनी काढली धिंड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहरातील पुंडलिकनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणारा कुख्यात गुंड पवन दिवेकर आणि त्याच्या टोळीची पोलिसांनी चांगलीच जिरवली आहे. हनुमाननगर चौकात ज्या ठिकाणी या टोळीने भरदिवसा गोळीबार करून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते, त्याच रस्त्यावरून पोलिसांनी आज सर्व ८ आरोपींची हातबेड्या ठोकून पायी धिंड काढली. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आणि गुंडांच्या मनातील कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी सुरू केलेल्या या ‘धिंड पॅटर्न’ची सध्या संपूर्ण शहरात मोठी चर्चा सुरू आहे.

    नेमकं काय घडलेलं?

    या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, एका सार्वजनिक कार्यक्रमात फोटो लावल्याच्या अतिशय क्षुल्लक वादातून पवन दिवेकर आणि निलेश रांजणे यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि गुरुवारी रात्री याच रागातून भरचौकात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे हलवली. गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी पहाटेपर्यंत पवन दिवेकर, निलेश रांजणे, आदित्य दाभाडे, आकाश साळुंखे, अमोल साळुंखे, ओंकार गिरी यांच्यासह एकूण आठ जणांना बेड्या ठोकल्या.

    पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न

    विशेष म्हणजे, अटकेची चाहूल लागताच मुख्य आरोपी पवन दिवेकर हा पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पैठण गेट परिसरात पोलिसांनी त्याला घेरले असता, त्याने चक्क फौजदार अर्जुन राऊत यांना धक्काबुक्की केली आणि पोलीस कर्मचारी बीडकर यांच्यावर धारदार चाकू उगारला. पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पवन दिवेकरवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणखी एक गंभीर गुन्हा क्रांती चौक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

    भरबाजारातून धिंड

    गुन्हेगारांची ही दहशत कायमची मोडीत काढण्यासाठी पुंडलिकनगर पोलिसांनी या सर्व आरोपींना भरबाजारातून हातबेड्या घालून पायी चालवले. ज्या आरोपींनी गोळीबार करून शहराची शांतता भंग केली होती, त्यांना अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी अपमानित होताना आणि पोलिसांपुढे हतबल झालेले पाहून स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. डॉन होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी दिलेला हा ‘लाईव्ह धडा’ सध्या शहरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा