Digital Arrest: मुंबईत डिजिटल अरेस्टचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, एटीएस आणि एनआयए अधिकारी असल्याचे भासवून एका फार्मा मॅनेजरची ४८ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका तरुणाला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव स्वप्नील चव्हाण (३२) असे आहे. स्वप्नील हा मुळचा शेतकरी असून त्याची एक ॲग्रो कंपनी आहे. मात्र, जादा पैशांच्या आमिषाने त्याने आपले बँक खाते सायबर गुन्हेगारांना उपलब्ध करून दिले. या खात्याचा वापर ‘म्युल अकाउंट’ म्हणून करण्यात आला. तपासात समोर आले आहे की, पीडित व्यक्तीने ट्रान्सफर केलेल्या एकूण रकमेपैकी १० लाख रुपये थेट स्वप्नीलच्या खात्यात जमा झाले.
ATS-NIA अधिकारी असल्याचं सांगून रचला सापळा
या प्रकरणातील फिर्यादी हे भायखळा येथील एका नामांकित फार्मसी कंपनीत शाखा व्यवस्थापक आहेत. ७ जानेवारी रोजी त्यांना एका अज्ञात नंबरवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपण कुलाबा पोलीस मुख्यालयातून ‘निरीक्षक रणजीत कुमार सिंह’ बोलत असल्याचे भासवले. तुमच्या आधार कार्डचा वापर देशविरोधी कारवायांसाठी झाला असून, तुमच्यावर गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी भीती त्यांना घालण्यात आली.
Pune Crime : काळजाचा तुकडा गेला; 11 महिन्यांच्या आदितीचा चुकीच्या उपचारांनी मृत्यू, ससून समितीच्या अहवालानंतर डॉक्टरांवर गुन्हा, पुण्यात खळबळ
व्हिडिओ कॉलवर ‘ डिजिटल अरेस्ट ‘
भामट्यांनी केवळ फोनवरच न थांबता, पीडित व्यक्तीला व्हिडिओ कॉल केला. समोर बसलेले व्यक्ती एटीएस (ATS) आणि एनआयए (NIA) चे वरिष्ठ अधिकारी असल्याचे दाखवण्यात आले. यावेळी त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) करण्यात आले असून तुम्ही घराबाहेर पडू नका, अन्यथा अटक होईल अशी धमकी दिली. विश्वास बसावा यासाठी गुन्हेगारांनी बनावट अटक वॉरंट, मालमत्ता जप्तीचे आदेश आणि काही गोपनीय सरकारी कागदपत्रे व्हॉट्सॲपवर पाठवली.
४८ लाखांचा चुना
या ‘फेक’ चौकशीतून सुटका करण्यासाठी आणि ‘नॉन-इन्व्हॉल्व्हमेंट सर्टिफिकेट’ मिळवण्यासाठी बँक खात्यातील पैसे पडताळणीसाठी (Verification) पाठवण्यास सांगण्यात आले. अटकेच्या भीतीने घाबरलेल्या व्यवस्थापकाने ८ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान सिटी युनियन बँक, एसबीआय आणि इक्विटास बँकेच्या विविध खात्यात एकूण ४७.९९ लाख रुपये ट्रान्सफर केले. पैसे मिळाल्यावर मात्र आरोपींनी संपर्क तोडला, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे व्यवस्थापकाच्या लक्षात आले.
सायबर पोलिसांचे आवाहन
याप्रकरणी काळाचौकी येथील रहिवासी असलेल्या पीडिताने सायबर हेल्पलाइन १९३० वर तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे स्वप्नील चव्हाणला अटक केली आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती लोक सहभागी आहेत आणि स्वप्नीलने इतर कोणाकोणाची खाती वापरली आहेत, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांची टीम करत आहे.
