Tragic Incident In Nagpur : नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पाणी समजून चुकून तारपीन प्यायल्यामुळे अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. वाठोडा परिसरातील या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीडगाव येथे घडली. मृत बालकाचे नाव अद्वविक शाम भदाडे असे असून, त्याचे वडील शाम भदाडे हे केटरिंग व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरात पेंटिंगचे करण्यात आले होते. त्या वेळी वापरण्यासाठी तारपीन आणण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर उरलेली तारपीनची बाटली घरातील स्टोअर रूममध्ये ठेवण्यात आली होती. १२ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास अद्वविक घराबाहेर खेळत होता.
खेळता-खेळता तो स्टोअर रूमजवळ पोहोचला. तिथे ठेवलेल्या बाटलीतील द्रव पाणी असल्याचा समज करून त्याने ती तारपीन पिऊन टाकली. तारपीन पिताच त्याची प्रकृती झपाट्याने बिघडू लागली. काही वेळातच तो अस्वस्थ झाला. घडलेला प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने त्याला पारडी येथील भवानी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हलवण्याचा सल्ला दिला. पुढील उपचार सुरू असतानाच या निष्पाप चिमुकल्याने अखेर प्राण सोडले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, भदाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका छोट्याशा दुर्लक्षामुळे एवढी मोठी जीवितहानी झाल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, वाठोडा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. ही घटना पुन्हा एकदा घरामध्ये ठेवण्यात येणाऱ्या धोकादायक रसायनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते. तारपीन, आम्ल, कीटकनाशके यांसारखे विषारी पदार्थ लहान मुलांच्या आवाक्याबाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः अशा पदार्थांच्या बाटल्यांवर स्पष्ट लेबल लावणे, त्या लॉक करून ठेवणे किंवा मुलांना सहज पोहोचणार नाही अशा उंच ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. पालकांची क्षणिक निष्काळजीपणा देखील जीवघेणा ठरू शकतो, याची जाणीव या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आली आहे.
