• Sun. Jun 7th, 2026

    Navi Mumbai Airport: विमान प्रवाशांना दिलासा, नवी मुंबई विमानतळावर तिसऱ्या रनवेची तयारी, CIDCO कडून कामाला गती

    Navi Mumbai Airport: विमान प्रवाशांना दिलासा, नवी मुंबई विमानतळावर तिसऱ्या रनवेची तयारी, CIDCO कडून कामाला गती

    Third Runway: मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि विमान वाहतुकीची वाढती मागणी लक्षात घेता. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून (CIDCO) तिसरा रनवे बांधण्याच्या नियोजनासाठी अभ्यास केला जात आहे. यामुळे विमानतळांना भविष्यातील वाढत्या विमान प्रवाशांचा भार पेलणे सोपे होईल.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    Third Runway Expansion: सध्या नवी मुंबईत विमानतळाचे काम दोन रनवेच्या नियोजनासह वेगाने सुरू आहे. मात्र, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने ( CIDCO ) आता तिथे तिसरा रनवे बांधणे शक्य आहे का, याचा तांत्रिक अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी राईट्स ( RITES ) लिमिटेड आणि क्रिएटिव्ह ग्रुप एलएलपी यांच्या संयुक्त उपक्रमाची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. हा अभ्यास सहा महिन्यांपू्र्वीच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मुंबई महानगर प्रदेशातील ( MMR ) वाढत्या विमान प्रवाशांच्या संख्येचे नियोजन करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

    नवी मुंबई विमानतळाचा विस्तार

    1997 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली 15 एप्रिल रोजी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. ज्यामध्ये सिडकोचे वरिष्ठ अधिकारी आणि राईट्स आणि क्रिएटिव्ह ग्रुप एलएलपीच्या प्रतिनीधींच्या उपस्थितीत या निर्णयावर चर्चा करण्यात आली. विजय सिंघल यांचे म्हणणे आहे की, ‘वर्ष 2040 पर्यंत मुंबई आणि आसपासच्या परिसरात (MMR) विमान प्रवाशांची वार्षिक संख्या 15 कोटी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्याचे मुंबई विमानतळ आधीच पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. त्यामुळे भविष्यातील या प्रचंड गर्दीचे नियोजन करण्यासाठी नवी मुंबई विमानतळाचा विस्तार करण्याची गरज आतापासूनच भासत आहे. त्यामुळे दूरदृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे.’

    विमानतळ विस्ताराच्या अभ्यासाठी सल्लागारांची नेमणूक

    सिडकोने या अभ्यासासाठी सल्लागारांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तिसर्‍या रनवेसाटी पुरेशी जमीन उपलब्ध आहे का?, विमानांच्या उड्डाणासाठी आणि सेफ लँडिंगसाठी तांत्रिकदृष्ट्या तिसरा रनवे सुरक्षित असेल का?, पर्यावरणावर याचा काय परिणाम होईल? अशा अनेक प्रश्नांचा अभ्यास या अभ्यासात केला जाणा आहे.

    भारतातील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक

    छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासह आणखी एक विमानतळ प्रणालीचा भाग म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, हे भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक म्हणून विकसित केले जात आहे. यामुळे शहरावरील प्रवाशांचा ताण विभागला जाईल.

    तिसऱ्या रनवेचे नियोजन करणे अत्यावश्यक

    नवी मुंबईचे हे विमानतळ 1 हजार 160 हेक्टर अशा अतिशय अवाढव्य जागेवर पसरलेले आहे. जेव्हा हे पूर्णपणे तयार होईल, तेव्हा दरवर्षी तब्बल 9 कोटी प्रवासी प्रवास करू शकतील. तसेच दरवर्षी 3.2 दशलक्ष टन माल वाहून नेला जाऊ शकेल. विजय सिंघाल यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई महानगर क्षेत्राची लोकसंख्या 2 कोटींच्या वर गेली आहे. 2040 पर्यंत विमान प्रवाशांची संख्या 15 कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता विजय सिंघल यांनी वर्तवली आहे.

    सध्याची दोन्ही विमानतळे एक प्रणाली म्हणून कार्यरत राहिली तरी केवळ 15 कोटी प्रवाशांची सोय होऊ शकते. पण 2040 नंतर ही दोन्ही विमानतळे देखील अपुरी पडतील. याचे कारण असे की, 2050 दरम्यान प्रवाशांची संख्या 240 दशलक्षापर्यंत जाऊ शकते. त्यामुळे तिसऱ्या रनवेचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे.

    टीम मटा ऑनलाइन

    लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.… आणखी वाचा