CBSE दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा या परिक्षेत ९३.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. पुणे विभाग ९६.६६ टक्क्यांसह देशात सातव्या स्थानावर राहिला आहे.
मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.९९ टक्के इतके असून, मुलांच्या तुलनेत ते अधिक आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.६० टक्के आहे. देशभरातून सुमारे २४.७१ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २३.१६ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात ०.०४ टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवण्यात आली आहे. गुणवत्तेच्या शर्यतीला आळा घालण्यासाठी अव्वल विद्यार्थ्यांची यादी जाहीर न करण्याचा निर्णय यंदाही कायम ठेवण्यात आला आहे. उच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २.२१ लाखांहून अधिक असून, ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांची संख्या ५५ हजारांपेक्षा अधिक आहे. विशेष गरजांच्या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत ९६.२४ टक्के इतका उच्च निकाल नोंदवला आहे.
शाळानिहाय निकालात केंद्रीय विद्यालयांनी पुन्हा एकदा आघाडी घेत ९९.५७ टक्के निकाल नोंदवला आहे. त्या खालोखाल जवाहर नवोदय विद्यालयांचा निकाल ९९.४२ टक्के आहे. खासगी, सरकारी आणि अनुदानित शाळांचा निकाल अनुक्रमे ९३.७७, ९१.४३ आणि ९१.०१ टक्के इतका लागला आहे. परदेशातील सीबीएसई शाळांचाही निकाल ९९.१० टक्के इतका उच्च राहिला आहे.
Two brothers One wife : दोन सख्ख्या भावांशी लग्न करणारी महिला आई झाली, चिमुकली पावलं घरी येताच परदेशी राहणाऱ्या पित्याची प्रतिक्रिया समोर
पुणे विभाग सातव्या स्थानी
तिरुअनंतपुरम आणि विजयवाडा विभागांनी ९९.७९ टक्के निकालासह अव्वल स्थान पटकावले आहे. त्याखालोखाल चेन्नई विभागाचा निकाल ९९.५८ टक्के, दिल्ली पश्चिम विभागाचा निकाल ९७.४५ टक्के, दिल्ली पूर्व विभागाचा निकाल ९७.३३ टक्के लागला. पुणे विभाग ९६.६६ टक्के निकालासह सातव्या स्थानावर आहे. गुवाहाटी विभागाचा निकाल सर्वांत कमी म्हणजे ८५.३२ टक्के इतका राहिला आहे.
पुण्यात गुणवंत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
पुणे विभागात यंदा विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवत उच्च टक्केवारी गाठली आहे. एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमधील मुर्तजा रावत (९९.८%), निहार लोहाडे (९९.४%) आणि ऋषभ कोरलाहल्ली (९९.२%) यांनी विशेष कामगिरी केली. अनेक शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून बहुतांश विद्यार्थ्यांनी ९० ते ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
