Goregaon NESCO Music Concert Overdose : वैद्यकीय अहवाल आणि बचावलेल्या तरुणीच्या जबाबातून या कार्यक्रमात दारूसह अंमली पदार्थांचे सेवन झाल्याचे स्पष्ट झाले. संबंधित तरुणीने यापूर्वीही अशा कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांचे सेवन केल्याची कबुली दिली
म्युझिक कॉन्सर्टमध्ये नशेचा ट्रेण्ड
भाड्याने बंगला किंवा रिसॉर्ट घेऊन केल्या जाणाऱ्या या रेव्ह पार्ट्या पोलिसांच्या रडारवर येत असल्याने म्युझिक कॉन्सर्टमध्येच अंमली पदार्थांचे सेवन करण्याचा ट्रेण्ड वाढत चालला आहे. हजारोंची गर्दी, आतमध्ये अंधार, पोलिस नाही तर खासगी सुरक्षा आणि मुंबईतच अंमली पदार्थ सेवनाची संधी मिळत असल्याने मुंबईत होणाऱ्या संगीत रजनी हाऊसफुल्ल होत आहेत.
दोघा विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू
नेस्को सेंटरमध्ये ११ एप्रिल रोजी नेस्को आणि इन्स्पायरिंग टाय प्रोडक्शन यांच्या वतीने ‘९९९९९९९९९- टेक्नो इव्हेन्ट’ या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाइन तिकीटविक्री झालेल्या या कार्यक्रमाला सुमारे चार हजार तरुण-तरुणी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान अस्वस्थ झालेल्या काही जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी बिस्मातसिंह भसीन याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर श्रेया राय (२४) हिचाही पुढील उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Snake Bite : जिन्यात मृत्यू दबा धरुन बसलेला! खेळता-खेळता शंभू रडू लागला, प्रकृती बिघडताच डॉक्टरांकडे नेलं, पण दांडगे कुटुंबावर काळाने घाव घातलाच
बचावलेल्या तरुणीचा धक्कादायक जबाब
वैद्यकीय अहवाल आणि बचावलेल्या तरुणीच्या जबाबातून या कार्यक्रमात दारूसह अंमली पदार्थांचे सेवन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित तरुणीने यापूर्वीही अशा कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थ घेतल्याची कबुली दिली आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या काही विद्यार्थ्यांनीही दोन ते तीन वेळा अंमली पदार्थ सेवन केल्याचे मान्य केले आहे.
सध्या ICCU मध्ये उपचार घेत असलेल्या २५ वर्षीय तरुणीने पोलिसांना सांगितलं की, त्यांचा ग्रुप त्या रात्री ९.३० वाजता कॉन्सर्टच्या ठिकाणी पोहोचला. तिने तिच्या एका वर्गमित्राने—रौनकने—दिलेली एक पिवळ्या रंगाची गोळी पाण्यासोबत घेतली. मध्यरात्रीच्या सुमारास, तिच्या २४ वर्षीय मैत्रिणीनेही तशाच प्रकारची एक गोळी घेतली. “आम्ही एकत्र नाचत होतो आणि माझी मैत्रीण अगदी ठीक वाटत होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एका दुसऱ्या कार्यक्रमादरम्यान मी अशीच गोळी घेतली होती” असे त्या तरुणीने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर त्या कॉन्सर्टमध्ये नक्की काय घडलं, याची तिला काहीच आठवण नाही; तिला थेट रुग्णालयातच जाग आली, असं ती म्हणाली.
Praniti Shinde | खरातचे धागेदोरे बड्या नेत्यांपर्यंत त्यामुळे एन्काऊंटरची शक्यता, शिंदेंचा दावा
अंधार अन् गर्दीमुळे सेवन सोप्पं
मुंबईत दर आठवड्याला तीन ते चार ठिकाणी अशा म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन होत असल्याचे समोर आले आहे. हजारो रुपयांची तिकिटे घेऊन मोठ्या संख्येने तरुण यात सहभागी होतात. बहुतांश ठिकाणी खासगी सुरक्षारक्षक असतात; मात्र पोलिसांची उपस्थिती नसल्याने आणि अंधार, प्रचंड गर्दी व डिस्को लाइट्समुळे अंमली पदार्थ सेवन करणे सोपे होत असल्याचे दिसून आले आहे.
पोलिस यंत्रणेचे अपयश
या घटनेनंतर मुंबईतील म्युझिक कॉन्सर्टमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज सेवनावर पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा कार्यक्रमांना परवानगी देताना घालण्यात येणाऱ्या अटींचे पालन होते की नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी पोलिसांची असताना प्रत्यक्षात कोणतीही काटेकोर पाहणी होत नसल्याचे समोर आले आहे.
Solapur Crime : मी आणि सोनाली काल रात्री झोपलो, आता ती उठत नाहीये; जावयाचा घाबराघुबरा फोन; सासऱ्यांना संशय येताच मोठा ट्विस्ट
अमली पदार्थविरोधी पथक आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसारख्या यंत्रणांनाही याची माहिती न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नेस्को येथील घटनेनंतर आता या तथाकथित ‘संगीत रजनी’ प्रत्यक्षात ड्रग्ज पार्ट्यांमध्ये रूपांतरित होत असल्याची भीती व्यक्त केली जात असून, यावर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
