• Wed. Jun 17th, 2026
    Teacher Protest: शिक्षकांचे राज्यव्यापी आंदोलन! विविध मागण्यांसाठी 16 एप्रिलपासून मैदानात, काय आहेत मागण्या?

    Teacher Protest: ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने’चे अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांना निवेदन पाठवून प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात थेट संघर्षाची भूमिका जाहीर केली आहे.

    शिक्षक आंदोलन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्यातील शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्न, वेतनातील विलंब आणि प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे शिक्षकांचा संयम आता संपुष्टात येत आहे. विविध शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून १६ एप्रिलपासून राज्यभर तीव्र आंदोलने छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, यातही विविध शिक्षक संघटनांनी वेगवेगळ्या दिवशी आंदोलने पुकारल्यामुळे शिक्षकांच्या संघटनांमध्येच एकी नसल्याने शिक्षण विभागाला या आंदोलनांचा समाचार घेणे तुलनेने सोपे जाण्याची खंत काही शिक्षक व्यक्त करत आहेत.

    अतिरिक्त शिक्षक ठरवण्यासाठी वापरले जाणारे निकष तर्कहीन असून, त्यातून शिक्षकांचे वेतन रोखले जात आहे. हा प्रकार तातडीने थांबवून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे अभ्यंकर यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन ते सहा वर्षांपासून शिक्षकांची विविध देयके थकित असल्याकडे लक्ष वेधताना त्यांनी, निधी उपलब्ध असतानाही अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे कोट्यवधींचा निधी व्यपगत होत आहे. १५ एप्रिलपासून थकित देयकांची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी केली. तसेच निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांना सक्तीने ‘बीएलओ’ म्हणून जुंपले जात असल्याबाबत आक्षेप नोंदवत, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून शिक्षकांवर अशैक्षणिक जबाबदाऱ्या लादल्या जात आहेत. हे तातडीने थांबवावे, असे त्यांनी नमूद केले.

    Maharashtra TimesLadki Bahin Yojana: ई-केवायसीसाठी आमिषाला बळी पडू नका! लाडक्या बहिणींना मंत्री अदिती तटकरेंचे आवाहन
    दरम्यान, वेतनाच्या प्रश्नाने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून ‘शिक्षक भारती’ संघटनेने १७ एप्रिल रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. शालार्थ प्रणालीतील तांत्रिक अडचणींचे कारण देत वेतनाला होणारा विलंब हा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरील अन्याय आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही लालफितीच्या कारभारामुळे वेतन रखडत आहे, असे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी सांगितले.

    Maharashtra TimesMumbai Crime : गोरेगावात लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अंमली पदार्थांचा ओव्हरडोस, मुंबईतील दोन MBA विद्यार्थ्यांचा मृत्यू, पाच जणांना अटक
    ‘शालार्थ’ बिघाडाचा फटका अन्यायकारक’
    मुंबईतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या वेतनप्रश्नीही संताप वाढत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांची भेट घेत या प्रश्नी लक्ष घालण्याचे आवाहन केले. शालार्थ प्रणालीतील तांत्रिक अडचणींचा फटका मुंबईतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसणे अन्यायकारक आहे, असे दराडे यांनी स्पष्ट केले. याच मुद्द्यावर महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेनेही भूमिका तीव्र करत, वेतन हा शिक्षकांचा मूलभूत हक्क असून प्रशासनाच्या त्रुटींचा फटका कर्मचाऱ्यांना बसू नये. आठवडाभरात वेतन न झाल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा राज्याध्यक्ष तानाजी कांबळे यांनी दिला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा