Nanded Shrikant Shinde: पक्षांतर्गत वाद पाहून खासदार श्रीकांत शिंदे हे देखील अवाक् झाले होते.
शिंदेंच्या शिवसेनेत जुंपली; श्रीकांत शिंदेंसमोरच आमदाराचा पारा चढला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अर्जुन राठोड, नांदेड: नांदेडमध्ये पार पडलेली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आढावा बैठक चांगलीच चर्चेला आली आहे. या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समोरच पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. तसंच पदाधिकाऱ्यांनी खासदार शिंदे यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. आमदार संतोष बांगर यांनी तर चक्क घरचा आहेर देत पक्षातील मंत्र्यावरच निशाणा साधला. मंत्र्याच्या डोक्यात हवा गेली आहे, फोन उचलत नाहीत, उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या मंत्र्यांना हटवा, अशी थेट मागणी बांगर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. आमदार संतोष बांगर यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे होता, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेकडून सर्व जिल्ह्यांमध्ये आढावा बैठकीचं आयोजन केलं जात आहे. सोमवारी रात्री नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांची बैठक नांदेडमध्ये पार पडली. बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. नेत्यांकडून तिन्ही जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. हिंगोली वगळता परभणी आणि नांदेड जिल्ह्यात अंतर्गत वाद पाहायला मिळाला. कोणी जिल्हा प्रमुख तर कोणी तालुका प्रमुख बदलण्याची मागणी केली.
बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांची उघड नाराजी
शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत नाराजीनाट्य पाहायला मिळाले. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्याविरोधात माजी नगरसेवकाने नाराजी व्यक्त करत टीकेचा सूर लावला. हजारो कोटींमध्ये निधी मिळूनही महापालिकेत यश मिळालं नसल्याबद्दल कार्यकर्त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर रोष व्यक्त केला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. मी तुमचं ऐकण्यासाठी आलो आहे. हा पक्ष एकनाथ शिंदे चालवत आहेत. इतका निधी देऊनही जागा मिळत नसतील, तर त्याची दखल घेतली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच या परिस्थितीवरून त्यांनी आमदारांचे कान टोचत कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची सूचनाही दिली.
ऑपरेशन टायगरवर बोलणं श्रीकांत शिंदेनी टाळलं
सत्तेतील भाजपा पक्ष छोट्या मित्रपक्षाची शिकार करणार, असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. भाजप आणि शिवसेनेचे काय होणार हे लवकरच कळेल, असं रोहित पवार म्हणाले. मात्र रोहित पवार यांच्या विधानावर श्रीकांत शिंदे यांनी बोलणं टाळलं आहे. रोज कोणी ना कोणीतरी काही ना काहीतरी बोलत असतं, त्यावर उत्तर देणं आम्हाला गरजेचं वाटत नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो व्हायरल झाला आहे. हा ऑपरेशन टायगरचा भाग असू शकतो का? यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी बोलणं टाळलं असून ते म्हणाले की, “ऑपरेशन टायगरच्या बातम्या माध्यमांनीच दिल्या आहेत. आज आम्ही पक्षसंघटनेवर भर देत आहोत. आज कुठल्याही निवडणुका नाहीत, तरीदेखील पक्ष ग्राऊंडवर आहे, सर्व नेते ग्राऊंडवर आहेत. आम्हाला येणाऱ्या 2029 पर्यंत आमचा पक्ष मजबूत करायचा आहे. जिथं पक्षाच्या आमची ताकद कमी आहे तिथं ताकद वाढवायची आहे, एवढंच लक्ष आमचं आहे,” असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा