Chhagan Bhujbal Pune Helicopter Landing Incident : पुरंदरमधील खानवडीत हेलिकॉप्टर थेट पार्किंगमध्ये उतरल्याने खळबळ उडाली होती. या धक्कादायक प्रकारानंतर छगन भुजबळ यांनी स्वतः समोर येत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. त्यांनी नेमकं काय घडलं ते सांगत आम्ही सुरक्षित आहोत, असंही म्हटलं आहे.
‘अपघात म्हणणे चुकीचे’; हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये का उतरवलं? छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया समोर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आज घडलेल्या हेलिकॉप्टर लँडिंगच्या प्रकारावर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट भूमिका मांडत सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. “हा अपघात नाही, आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही,” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सीबीएसई इंटरनॅशनल शाळेच्या उद्घाटनासाठी आलेले हे हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर न उतरता थेट गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, भुजबळांनी दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या वेळी हेलिपॅड स्पष्ट न दिसल्यामुळे पायलटकडून निर्णय घेण्यात आला आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पार्किंग परिसरात हेलिकॉप्टर उतरवण्यात आले.
“अपघात म्हणणे चुकीचे ठरेल”
घटनेच्या वेळी शाळेचा परिसर, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अचानक हेलिकॉप्टर खाली उतरताना पाहून काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले, मात्र कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले नाही. “फक्त तांत्रिक कारणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, याला अपघात म्हणणे चुकीचे ठरेल,” असे भुजबळांनी स्पष्ट केले.दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा आणि तर्कवितर्क सुरू झाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. “आपण सर्व सुरक्षित बाहेर आलो आहोत, त्यामुळे विनाकारण अफवा पसरवू नयेत,” असे त्यांनी सांगितले.
Arvind Sawant : ‘उद्धवजींनी माझं कौतुक केलं, बैठकीत ऑपरेशन टायगर असा विषय नव्हता’; मातोश्रीतील बैठकीनंतर खासदार अरविंद सावंत काय म्हणाले?
“समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा”
याच वेळी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी काही सामाजिक मुद्द्यांवरही भाष्य केले. अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांपासून दूर राहण्याचे आवाहन करत समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काही प्रकरणांवर सरकारकडून लक्ष ठेवले जात असून योग्य ती कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षितातेबाबत विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी “त्या सुरक्षित आहेत, काळजी करण्याचे कारण नाही,” असे सांगितले.
चौकशी सुरू
या घटनेनंतर प्रशासनानेही तात्काळ चौकशी सुरू केली असून हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान नेमकी कोणती तांत्रिक अडचण निर्माण झाली याचा आढावा घेतला जात आहे. सुदैवाने या प्रकारात कोणतीही दुर्घटना घडली नसल्याने मोठा अनर्थ टळल्याचे स्पष्ट झाले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा