• Mon. Jun 15th, 2026

    Mumbai Metro 9: दहिसर-काशीगाव मेट्रोला सुरूवात! इंटरचेंजद्वारे कुलाबा, विमानतळापर्यंत प्रवास शक्य; दुसरा टप्पा लवकरच

    Mumbai Metro 9: दहिसर-काशीगाव मेट्रोला सुरूवात! इंटरचेंजद्वारे कुलाबा, विमानतळापर्यंत प्रवास शक्य; दुसरा टप्पा लवकरच

    Dahisar-Kashigaon Metro: शहरात मेट्रोचे जाळे वाढत असून मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दोन महत्त्वाच्या मार्गिकांचे लोकार्पण केले. दहिसर-काशीगाव मेट्रोचं भूमिपूजन 2018मध्ये झालं होतं आणि तेव्हापासून अनेकदा काम रखडलं. पण आता मार्गिका सुरू झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी,मुंबई: रोजच्या वाहतूककोंडीला कंटाळलेल्या हजारो प्रवाशांना दिलासा देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिका-9च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मंगळवारी केले. दहिसर पूर्व ते काशीगाव हा 4.7 किमी लांबीचा उन्नत मार्ग आज, बुधवारपासून प्रवाशांसाठी खुला होणार असून, यामुळे मिरा-भाईंदर परिसरातील प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे.

    अंधेरी, विमानतळापर्यंत प्रवास

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे, महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत मंगळवारी हा उद्घाटन सोहळा पार पडला. या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशीगाव अशी चार स्थानके आहेत. मेट्रो मार्गिका-9 ही मार्गिका 7 आणि 7अ शी जोडली गेल्याने अंधेरी तसेच विमानतळापर्यंतचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे रोजच्या प्रवासाचा वेळ कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.या प्रकल्पामुळे दहिसर टोल परिसरातील वाहतूककोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. अंदाजानुसार, 20 ते 30 टक्के प्रवासी रस्त्यांवरून मेट्रोकडे वळू शकतात. त्यामुळे गर्दीच्या वेळी वाहतुकीवरील ताणही कमी होणार आहे. परिणामी, दैनंदिन प्रवास अधिक जलद आणि सुकर होण्याची अपेक्षा आहे.

    वर्षाअखेर दुसरा टप्पा

    2018 साली भूमिपूजन झालेल्या दहिसर-काशीगाव मेट्रोचं लोकार्पण तब्बल आठ वर्षांनी झालं आहे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसरा टप्पा सुद्धा याच वर्षी पूर्ण होणार आहे अशी माहिती दिली. मेट्रो 9ला पुढे सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत जोडणारा हा टप्पा येत्या काही महिन्यांत सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच. संपूर्ण मेट्रो 2बी 2027 अखेरपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. डीएन नगर ते अंधेरी आणि मंडाळे ते मान्खुर्द अशा या 23.45 किमी लांब मार्गामुळे मुंबई पूर्व-पश्चिम परिसरांना जोडणी मिळणार आहे.

    कुलाब्यापर्यंत विस्तार

    दरम्यान, मेट्रो 9 च्या दहिसर स्थानकातील इंटरचेंजच्या मदतीने मेट्रो 7ने प्रवास करता येतो. तसेच, मेट्रो 7वरून मेट्रो 1 आणि मग मेट्रो 3च्या इंटरचेंजद्वारे थेट कोलाब्यापर्यंत पोहोचणं शक्य होणार आहे. त्यामुळे मेट्रो 9च्या मदतीने ठाणे जिल्ह्यातील काशीगाव परिसरातून थेट कुलब्यापर्यंत कनेकटीव्हीटी मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा