• Sun. Jun 14th, 2026
    Latur Crime : ‘अटक होणार नाही, केसमध्ये मदत करणार’; पीआयनेच खाकीला डाग लावला, लाखोंच्या बदल्यात गुन्हेगारीला अभय, एसीबीने रंगेहात पकडलं

    उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी आणि हवालदार राहुल नागरगोजे यांना ४५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. आरोपीला अटक न करण्यासाठी ३ लाखांची मागणी करण्यात आली होती. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

    ‘अटक होणार नाही, केसमध्ये मदत करणार’; पीआयनेच खाकीला डाग लावला, लाखोंच्या बदल्यात गुन्हेगारीला अभय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ऋषिकेश होळीकर, लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी एका गुन्ह्यातील आरोपीस अटक न करण्यासाठी ३ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. या अनुषंगाने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात पोलीस निरीक्षक पुजारी यांच्यासाठी पोलीस हवालदार राहुल नागरगोजे हे ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

    आरोपीला अटक न करण्यासाठी घेतले पैसे

    तक्रारदाराचे मेव्हणे रणजित मल्हारी पाटील यांच्या विरुद्ध दि. ३१ मार्च २०२६ रोजी उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यातील आरोपीस अटक न करण्यासाठी व तपासात इतर मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी व हवालदार नागरगोजे यांनी तक्रारदाराकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती. आरोपी पोलीस हवालदार नागरगोजे यांनी आरोपी पो. नि. पुजारी यांच्या सांगण्यावरून त्यांच्यासाठी उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे येथे पंचासमक्ष ५० हजार रुपये लाचेची मागणी केली.एसीबीकडून सापळा कार्यवाही आजमावली असता शहरातील अहमदपूर रोडवरील हॉटेल पंचवटी येथे ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाच स्विकारल्यानंतर हवालदार नागरगोजे यांनी तक्रारदार यांच्या समक्ष पोलीस निरीक्षक फोन करून तक्रारदार त्यांना भेटल्याची माहिती दिली. आरोपींनी लाच स्वीकारल्यानंतर एसीबीने पुजारी व हवालदार नागरगोजे यांना तात्काळ ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. नागरगोजे यांच्या अंगझडतीमध्ये मोबाईल हँडसेट व लाचेची रक्कम ४५ हजार रुपये मिळून आली. तर आरोपी लोकसेवक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या अंगझडतीमध्ये एक मोबाईल हँडसेट मिळून आला आहे.

    Maharashtra TimesBody Donation : मृत्यूनंतर शरीराचा उपयोग भावी डॉक्टरांना व्हावा; 91 वर्षीय आजींच्या इच्छेनुसार देहदान, तेराव्याचा खर्च वृद्धाश्रमाला

    पुजारी यांच्याच ठाण्यातून घेतले ताब्यात

    उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. एसीबीने पुजारी यांना त्यांच्या कार्यालयातूनच ताब्यात घेतले. तर थेट लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेऊन चौकशी करण्यात आली. त्यांच्या घरांची घरझडती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

    उदगीर ग्रामीण व शहर पोलीस ठाण्यात खळबळ

    उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी व उदगीर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार राहुल नागरगोजे यांना लाच स्वीकारताना एसीबीने यशस्वी सापळा लावून दुपारी २:३० वाजताच्या सुमारास ताब्यात घेऊन लातूर येथे घेऊन गेले. ही बातमी समजल्यानंतर उदगीर शहर व पोलीस ठाण्यात खळबळ उडाली होती.

    उदगीर ग्रामीण पोलिसात पोलीस निरीक्षक पुजारी व हवालदार नागरगोजे यांच्याविरुद्ध कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. एसीबी चे पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी कारवाई करण्यात आली. तर अधिक तपास पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे करीत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा