• Sun. Jun 7th, 2026

    Nagpur-Nanded Flight: उपराजधानीतून 14 शहरांसाठी विमानसेवा, आता थेट नांदेडला पोहोचता येणार; उन्हाळी वेळापत्रक लागू

    Nagpur-Nanded Flight: उपराजधानीतून 14 शहरांसाठी विमानसेवा, आता थेट नांदेडला पोहोचता येणार; उन्हाळी वेळापत्रक लागू

    Nagpur Airport: उन्हाळी हंगामासाठी देशातील सर्व विमानतळांवरती वेळापत्रकात बदल करण्यात आले असून नवीन शहरांसाठी सेवा सुद्धा सुरू होत आहेत. नागपूर विमानतळावरूनही 29 मार्चपासून थेट नांदेडसाठी विमानसेवा उपलब्ध होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: उपराजधानीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आगामी उन्हाळा सुखकर होणार आहे. विमानतळ प्रशासनाने आज, रविवारपासून लागू होणारे नवीन उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये एकूण १४ शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आता नागपूरकरांना नांदेडसाठी थेट विमानसेवा उपलब्ध होणार आहे.

    उड्डाणांची संख्या वाढली

    विमानसेवांचे उन्हाळी वेळापत्रक २९ मार्च रोजी सुरू होऊन २४ ऑक्टोबरपर्यंत प्रभावी राहणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार नागपूर-नांदेड या नवीन सेक्टरची भर पडल्याने एकूण गंतव्यस्थानांची संख्या तेरावरून चौदा झाली आहे. विमानतळावरून आता दर आठवड्याला एकूण ४८६ विमानांची ये-जा होणार आहे. मागील हिवाळी वेळापत्रकाच्या (४७८ फेऱ्या) तुलनेत यामध्ये आठ फेऱ्यांची वाढ झाली आहे. विमानतळावर दररोज सरासरी ७० विमान फेऱ्या (३५ आगमन आणि ३५ प्रस्थान) होतील.Maharashtra TimesAjit Pawar: अजित दादांच्या विमान दुर्घटनेला दोन महिने पूर्ण, VIP उड्डाणांसाठी कठोर नियम जाहीर; आता पायलटचा निर्णय अंतिम

    नागपूर विमानतळावरून सध्या ६ प्रमुख विमान कंपन्या आपली सेवा देताहेत. यामध्ये इंडिगो, एअर इंडिया, स्टार एअर, एअर अरेबिया, कतार एअरवेज, एअर इंडिया एक्सप्रेस यांचा समावेश आहे. प्रवाशांना नागपूरहून मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद, इंदूर, कोलकाता, गोवा यांसारख्या प्रमुख शहरांसह किशनगड आणि नवी मुंबईसाठीही विमानसेवा मिळेल. तसेच, दोहा आणि शारजाह या दोन आंतरराष्ट्रीय शहरांसाठीही थेट उड्डाणे सुरू राहणार आहेत. विमान फेऱ्यांमध्ये झालेली वाढ आणि नांदेडसारख्या नवीन शहराची जोड यामुळे व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

    Maharashtra TimesNavi Mumbai Airport: 4 मेट्रो मार्गिकांना जोडणी, दररोज 76 उड्डाणांना सुरुवात; नवी मुंबई विमानतळाचा विस्तार होणार

    शेड्यूल असे…

    ‘उडान’योजनेअंतर्गत नागपूर-नांदेड ही विमानसेवा ३१ मार्चपासून स्टार एअरकडून चालविण्यात येणार आहे. या सेवेमुळे नागपूरकरांसह नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाऱ्याला भेट देणाऱ्या शीख भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्टार एअरकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आठवड्यातील शुक्रवार वगळता इतर सर्व दिवशी ही सेवा उपलब्ध राहणार आहे. नांदेडहून नागपूरकडे येणारे विमान सकाळी ११.२० वाजता उड्डाण घेऊन दुपारी १२.२० वाजता नागपूर येथे पोहोचेल. त्यानंतर नागपूरहून नांदेडकडे जाणारे विमान दुपारी १२.५० वाजता उड्डाण घेऊन दुपारी १.३० वाजता नांदेड येथे दाखल होईल. या मार्गावर ८८ आसनक्षमतेचे केवळ इकॉनॉमी वर्ग असलेले विमान वापरण्यात येणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा