Coal Crisis: महानिर्मितीचे चंद्रपूरसह खापरखेडा, पारस, परळी, कोराडी, भुसावळ व नाशिक असे एकूण सात औष्णिक वीज केंद्रे आहेत.
यंदा विजेची वाढती मागणी लक्षात घेता उन्हाळ्यात मोठा कोळसा साठा सातत्याने वेळोवेळी महानिर्मितीला करून ठेवावा लागणार आहे. महानिर्मितीच्या सर्व केंद्रात किमान सरासरी १२ दिवस पुरेल एवढा कोळसासाठा आहे. परिणामी कोळश्याअभावी महानिर्मितीच्या कोणत्याची केंद्रावरून तूर्त तरी संचबंदी होणार नसल्याची स्थिती आहे. पण विजेची वाढती मागणी बघता पुढील एप्रिल व मे महिना वीजनिर्मिती करताना महानिर्मितीला आव्हानच ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
Raigad News : रायगडमध्ये हेल्मेटशिवाय प्रवास करणे महागात पडणार, पोलिसांकडून ‘नो हेल्मेट, नो राईड’ मोहीम
राज्याच्या या आव्हानात्मक परिस्थितीत कोळसा साठा सुरक्षित पातळीवर राखणे कठीण असले तरी, महानिर्मितीकडून त्यादृष्टीने सर्व स्तरावर सकारात्मक पावले उचलली जात आहेत. इंधन सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महानिर्मिती सध्या सर्व कोळसा कंपन्या आणि रेल्वे प्रशासनासोबत देशांतर्गत कोळसा पुरवठा वाढवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. प्रामुख्याने वेकोलि क्षेत्रासाठी पर्यवेक्षण, देखरेख आणि समन्वय यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबविण्यावर जोर देत असून तेथून होणाऱ्या पुरवठ्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. रेल्वे व्यतिरिक्त कोळसा उपलब्धतेचे इतर पर्याय अधिक सक्षम करण्यासाठी आणि त्याद्वारे कोळशाची प्रत्यक्ष प्राप्ती वाढवण्यासाठी सतत महानिर्मितीकडून प्रयत्न केले जात आहेत. इंधन साठ्याला अधिक बळकटी देण्यासाठी महानिर्मितीकडून रेल्वे व समुद्री मार्ग आयात कोळसाचे ‘ब्लेंडिंग’ आणि ‘बायोमास पेलेट्स’ चा वापर यांसारख्या विविध पर्यायांवर काम केले जात आहे.
महानिर्मितीच्या सर्व केंद्राला पाणी मिळणाऱ्या विविध धरणात समाधानकारक जलसाठा उरला आहे. त्यामुळे आता पाणीसाठा तूर्त चांगला असून उन्हाळ्यात पाण्याअभावी संचबंदी होणार नसल्याने मोठा दिलासा नागरिकांना मिळण्याचे संकेत आहेत.
केंद्रनिहाय पुरेल
केंद्र दिवस
चंद्रपूर –१२
खापरखेडा –१०
पारस –१३
परळी –८
भुसावळ –१०
नाशिक –१२
कोराडी –२०
सर्वतोपरी प्रयत्न सुरू
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोळशाचा पुरेसा साठा राखण्यासाठी सर्वसमावेशक नियोजन करण्यात आले आहे. कोळसा वाहतुकीचे नियोजन करताना काही लॉजिस्टिक पातळ्यांवर, विशेषतः दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनमध्ये ‘रेल्वे रेक्स’च्या उपलब्धतेबाबत समन्वय साधून पुरवठा अधिक गतिमान करण्यावर भर दिला जात आहे. राज्यात सध्या वाढत्या मागणीच्या परिस्थितीतही, ग्राहकांना विनाअडथळा वीज पुरवठा व्हावा यासाठी महानिर्मितीकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याची माहिती महानिर्मितीच्या सूत्रांनी ‘मटा’शी बोलताना दिली.