Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरात याच्या घरातून डिजिटल पुरावे व आक्षेपार्ह कागदपत्रे यापूर्वीच जप्त केली आहे. भौतिक पुरावे, विशेषतः महिलांचे केस व पूजेचे साहित्य आता नाशिक व पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.
एसआयटीसह फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने गुरुवारी (दि.२६) ‘क्राइम सीन, डू नॉट क्रॉस’ची पिवळी पट्टी लावून खरातचे कार्यालय असलेल्या संपूर्ण परिसराचा ताबा घेतला. यानंतर त्याच्या कार्यालयाची कसून झडती घेण्यात आली. यावेळी महिलांचे केस, तांब्याची बाटली, तांत्रिक पूजांसाठी वापरले जाणारे साहित्य, विविध पुस्तके, संशयास्पद पदार्थांसह आर्थिक व्यवहारांची महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. हस्तगत केलेल्या सर्व वस्तूंचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी कार्यालय बंद केले. खरातची सर्व बँक खाती शोधून ती तातडीने गोठवण्यासाठी बँकांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
Ashok Kharat Case Update : शक्तिवर्धक औषधांमुळे बसलेला अर्धांगवायूचा झटका, खरातच्या HIV टेस्टचा निकालही समोर आला
‘त्यांच्या’वर गुन्हा
खरात प्रकरणातील पीडित महिलेचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास ‘सिडको व सातपूर वॉचमन’ नावाच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर हे व्हिडीओ प्रसारित करण्यात आले. सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयित सिद्धार्थ रामोशे, रमीज शेख, राहुल पवार, प्रवीण काटे, राहुल हिवाळे व साहिल सय्यद अशी संशयितांची नावे आहेत.
पिस्तूल परवाना निलंबित
अशोक खरातला जिल्हा प्रशासनाने शस्त्र परवाना दिला होता. हा परवाना निलंबित करण्यात आला. हा परवाना कायमस्वरूपी रद्द का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस त्याला बजावण्यात येणार आहे.
Ashok Kharat : माझ्या अंतर्मनाने धोका दिला, ज्यांचं भलं केलं तेच उलटले, अशोक खरातची बडबड, पोलीस कोठडीतही मंत्रजप
औषधविक्रेते, सराफांची होणार चौकशी
संशयित खरात हा पीडित महिलांना पेढा किंवा पाणी देत असे. ते सेवन केल्यानंतर गुंगी येत असल्याचे महिला सांगतात. खरात ज्या ठिकाणांहून जडीबुटी खरेदी करत होता, त्या औषधविक्रेत्यांची सखोल चौकशी पोलिस करणार आहेत. हे औषध सेवन केल्यानंतर शरिरावर किती वेळात काय परिणाम होतात, याची माहिती पोलिस तज्ज्ञांकडून घेणार आहेत. अत्यंत स्वस्तातील काचेचे खडे भाविकांना चमत्कारी असल्याचे सांगत तो लाखो रुपये उकळत असे. या व्यवसायात खरातचे काही सराफ व्यावसायिकांशीही लागेबांधे असण्याची शक्यता असल्याने पोलिस संबंधित सराफांचीही चौकशी करणार आहेत.
खरातचा परवाना निलंबित केला आहे. तो कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी संबंधित शस्त्रधारक खरातची बाजू ऐकणे आवश्यक आहे. त्याकरिता कारणे दाखवा नोटीसही दिली जाईल. संबंधित व्यक्ती तुरुंगात असल्याने ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची याबाबत लवकरच निर्णय घेणार आहोत. –रोहितकुमार राजपूत, निवासी उपजिल्हाधिकारी
