• Sat. Jun 6th, 2026
    Devendra Fadnavis : ‘जिन्हें हाथ पकडकर चलना था, हैरत है, वे बात पकडकर बैठ गए’, ठाकरेंच्या निरोप समारंभाला फडणवीसांची शायरी

    उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ आता संपत आहे. या निमित्ताने त्यांचा निरोप समारंभ आज विधान परिषदेच्या सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत निरोप समारंभाचं भाषण केलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांचा आज निरोप समारंभ आहे. खरं राजकारणात मतभेद असतात, वेगवेगळ्या भूमिका असतात, कधी आपण सोबत असतो, कधी संघर्ष करतो. पण या पलिकडचं देखील एक नातं राजकारणात असतं. ते नातं असतं सहप्रवासाचं. उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा प्रवास हा अनेक वर्षांचा आहे. आम्ही अनेक वर्ष सहप्रवासी राहिलेलो आहोत. आम्हाला अनेक चांगल्या गोष्टी समाजाकरता, राज्याकरता एकत्रित करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले.

    “उद्धव ठाकरेंचा स्वभाव आणि व्यक्तीमत्व यामध्ये राजकारण थोडं कमी आहे. मला असं वाटतं की, त्यांचा स्वभाव राजकारणी नाही. त्यामुळेच ते अनेकदा जे निर्णय घेतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती उद्भवते. पण हा एक गुण मला असं वाटतं की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचाही होता की, एकदा ठरवलं की निर्णय घेऊन टाकायचा. तशा पद्धतीचा स्वभाव उद्धवजींचा आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    देवेंद्र फडणवीस काय-काय म्हणाले?

    “उद्धवजी तसे छायाचित्रकार आहेत, अतिशय निष्णांत तज्ज्ञ, सुप्रसिद्ध छायाचित्रकार आहेत. महाराष्ट्राच्या विविध छटा या उद्धव ठाकरेंनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्रित केल्या आहेत. गडकिल्ले, निसर्ग, वारकरी परंपरा, हे सगळं त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलं. हे सगळे फोटोग्राफ पाहिल्यानंतर त्यापाठीमागील त्यांचं संवेदनशील मन पाहायला मिळतं. म्हणूनच महाराष्ट्र देशा आणि पहावा विठ्ठल ही त्यांची कामे केवळ छायाचित्र नाहीत तर आपल्या संस्कृतीची जपणूक या माध्यमातून करण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे. हे करण्याकरता त्यांनी खूप कष्ट देखील घेतले आहेत. वारीचे छायाचित्रण केलं तेव्हा हेलिकॉप्टरचा दरवाजा उघडून त्यांनी छायाछित्रण केलं.”

    उद्धव ठाकरेंसोबतच्या मैत्रीबद्दल भाष्य

    “राजकारणामध्ये आल्यानंतरदेखील उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले. यानंतर जो काही संघर्ष होता, बराच काळ आम्ही सोबत त्या संघर्षातून पुढे गेलो. माझी आणि त्यांची जवळीक 2010 नंतर आली, 2014 नंतर अधिक आली. पण मला असं वाटतं की, या सगळ्या काळात मैत्रीची भावना आमच्यात तयार झाली. मी असं म्हणणार नाही की, आज ती नाहीत. शेवटी त्यांच्या राजकीय भूमिका आहेत आणि आमच्या राजकीय भूमिका आहेत, त्या राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या.”

    “एक गोष्ट मला या निमित्ताने निश्चितपणे सांगायची आहे, राजकारणात काम करत असताना अनेकवेळा बघितलं की, एखादा निर्णय घेत असताना त्याच्या परिणामांची चिंता केली नाही. एक गुण आहे, जो हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एक पायंडा पाडला की, सामान्यातील सामान्य माणसाला ज्याला राजकीय चेहरा नाही, अशा व्यक्तीला देखील राजकीय चेहरा देणं, त्यातून राजकीय नेतृत्व उभं करणं हा गुण निश्चित शिकण्यासारखा आहे. बाळासाहेबांनी तो गुण आपल्या सर्वांना दिला. उद्धव ठाकरेंनी तो गुण जोपसला.”

    ‘उद्धव ठाकरेंना कोट्याधीशची उपाधी देईन’

    “पु.ल. देशपांडेंना कोट्याधीश म्हणतात, पण त्यांच्यानंतर कुणाला ही कोट्याधीश उपाधी द्याची असेल तर मी उद्धव ठाकरेंना देईन. त्यांच्या बोलण्यात अनेकदा मिश्किलपणा असतो. ते सहजतेने बोलताना दिसतात. अनेकदा ते भिडताना दिसतात, खूप जोरदार प्रतिवाद करताना दिसतात. पण त्यांचा मूळ स्वभाव तो नाही. त्यांचा मूळ स्वभाव हा शांत, संयमी आहे, संबंध ठेवायचा मूळ स्वभाव आहे. आपल्याला राजकारणात वेगवेगळ्या प्रकारचा आवेश आणावा लागतो. त्याप्रमाणे तो आवेश देखील आणताना आपण पाहतो. पण या सगळ्या परिस्थितीत मला एक गोष्ट निश्चितपणे वाटते. आता या सभागृहात ते सहा वर्षे होते. त्यांनी निर्णय घेतला तर.”

    फडणवीसांची ठाकरेंसाठी शायरी

    “आम्ही एकत्र होतो. पण २०१९ ला काय झालं. आम्ही वेगवेगळे झालो. म्हणून मला केवळ एक शेर ऐकवायची इच्छा आहे. साजिश की सौगात पकडकर बैठ गए, अनचाहे हालात पकडकर बैठ गए, जिन्हें मेरा हाथ पकडकर चलना था, हैरत है, वे बात पकडकर बैठ गए”

    “ठिक आहे, आपला रस्ता कुठलाही असला तरी तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्हाला उत्तम आरोग्य मिळो. तुमचं नेतृत्व अशाचप्रकारे सगळ्या पक्षाला मिळत राहो आणि राजकारणात तुमची प्रगती होत राहो. आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो.”

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा