• Mon. Jun 15th, 2026

    ‘पल्स-२०२६’ : महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्राला दिशा देणारी महत्त्वपूर्ण परिषद! – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 24, 2026
    ‘पल्स-२०२६’ : महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्राला दिशा देणारी महत्त्वपूर्ण परिषद! – महासंवाद

    महाराष्ट्राने आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांप्रमाणेच वैद्यकीय सेवेतही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आधुनिक वैद्यकीय शिक्षण, अत्याधुनिक रुग्णालये, संशोधन संस्था आणि कुशल डॉक्टर यांच्या बळावर राज्य देशाच्या वैद्यकीय व्यवस्थेत अग्रस्थानी आहे. या क्षमतेला जागतिक स्तरावर अधोरेखित करण्यासाठी २७ व २८ मार्च २०२६ रोजी ‘पल्स-२०२६’ पल्स (PULSE) प्लॅटफॉर्म फॉर युनिफाइड लर्निंग, स्किल्स, हेल्थ अँड एज्युकेशन ही महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार असून राज्यात वैद्यकीय क्षेत्राचा विस्तार होण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण परिषद ठरणार आहे.

    राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यवस्था सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित केल्याशिवाय राज्याचा सर्वांगीण विकास शक्य नाही. राज्याची वैद्यकीय व्यवस्था अधिक आधुनिक, तंत्रज्ञानसज्ज, संशोधनप्रधान आणि सर्वसमावेशक करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. परिषदेत वैद्यकीय शिक्षणक्षेत्रातील विद्यार्थी, अधिष्ठाता, विशेषतज्ज्ञ, खाजगी शैक्षणिक संस्था तसेच आधुनिक वैद्यकीय उपकरणे उत्पादक कंपन्या सहभागी होणार आहेत. राज्याच्या मेडिकल टूरिझम आणि ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेचा दर्जा सुधारणे यासाठी या परिषदेची भूमिका महत्वाची ठरेल.

    राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या पुढाकारातून आयोजित होणारी ही परिषद वैद्यकीय शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, वैद्यकीय सेवा व्यवस्थापन आणि वैद्यकीय पर्यटन यांना एकत्र आणणारा व्यापक मंच आहे. या परिषदेत देश-विदेशातील नामवंत डॉक्टर, संशोधक, वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील धोरणनिर्माते तसेच उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. आधुनिक वैद्यकीय व्यवस्थेतील आव्हाने आणि त्यावरील उपाय यावर सखोल चर्चा होण्यासाठी हे एक व्यासपीठ ठरेल.

    महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्राचा जागतिक लौकिक

    वैद्यकीय सेवा ही केवळ उपचारांपुरती मर्यादित नसून ती आर्थिक प्रगतीची मोठी संधीही ठरू शकते. जागतिक स्तरावर ‘मेडिकल टुरिझम’ म्हणजेच वैद्यकीय पर्यटनाचा वेगाने विस्तार होत आहे. कमी खर्चात दर्जेदार उपचार मिळण्याच्या दृष्टीने भारत आणि विशेषतः महाराष्ट्राकडे अनेक देशांचे लक्ष वेधले जात आहे. ‘पल्स-२०२६’ परिषद ही संधी अधिक प्रभावीपणे मांडण्याचे काम करणार आहे. महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण संस्था, सुपर-स्पेशालिटी रुग्णालये आणि संशोधन केंद्रांची मोठी संख्या आहे. या क्षमतेचा उपयोग करून राज्याला जागतिक वैद्यकीय सेवेत एक प्रभावी केंद्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. परिषदेकरिता जगभरातून २९०० पेक्षा जास्त तज्ञ, जवळपास १३० नामांकित डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील अभ्यासक संशोधक येणार आहेत. या परिषदेत वगेवेगळी २० सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

    राज्य वैद्यकीय क्षेत्रात अग्रगण्य असून देश-विदेशातील तज्ज्ञ, संशोधक, उद्योगपती आणि धोरणकर्ते या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यांच्या सहभागामुळे नवीन तंत्रज्ञान, आधुनिक उपचारपद्धती आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक राज्यात येण्यास मदत होईल. याचा थेट फायदा रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यात, डॉक्टरांना नवीन संधी उपलब्ध होण्यात आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण व संशोधनाचा अनुभव मिळण्यात होणार आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळणे, आयुष क्षेत्रात आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांच्यात समन्वय साधून एकात्मिक वैद्यकीय व्यवस्था निर्माण करणे, फार्मसी क्षेत्रातील नवीन संशोधन, डॉक्टरांचे संशोधन पेपर आणि नवकल्पना यांचे सादरीकरणही परिषदेत होणार आहे.

     वैद्यकीय वेलनेस पर्यटनासाठी ‘महाराष्ट्र ब्रँड’

    ‘पल्स – २०२६’ परिषदेमार्फत महाराष्ट्राला वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचे महत्त्वपूर्ण केंद्र बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र ब्रँड’ म्हणून वैद्यकीय पर्यटनाची ओळख निर्माण करण्यासाठी राज्यातील रुग्णालये, वेलनेस केंद्रे, संशोधन संस्था आणि पर्यटन क्षेत्र यांच्यात समन्वय निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे राज्यात वैद्यकीय सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय उपकरणे, जैवतंत्रज्ञान, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि संशोधन यांसारख्या क्षेत्रांना नवी चालना मिळणार आहे. याचा थेट परिणाम रोजगारनिर्मितीवरही होईल.

    वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाला चालना

    ‘पल्स-२०२६’  परिषदेत वैद्यकीय शिक्षणातील सुधारणा आणि संशोधनाला प्रोत्साहन मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल हेल्थ, रोबोटिक सर्जरी, टेलीमेडिसिन यांसारख्या नव्या संकल्पना वैद्यकीय शिक्षणात कशा समाविष्ट करता येतील यावर या परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. आज वैद्यकीय क्षेत्र अत्यंत वेगाने बदलत आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे निदान आणि उपचार पद्धती अधिक अचूक आणि परिणामकारक होत आहेत. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे आणि विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान व कौशल्ये उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. ‘पल्स-२०२६’ ही परिषद त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. ‘डिजि होम’ आणि ‘टेक टॉक’ या विशेष संकल्पना सुद्धा या परिषदेत असतील. ३६० डिग्री डोममध्ये रोबोटिक सर्जरी, व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये मेडिकल प्रशिक्षण, डिजिटल हॉस्पीटल व्यवस्थापन यासारख्या तंत्रज्ञानाचे लाईव्ह आणि इमर्सिव्ह प्रेझेंटेशन सादर केले जाणार आहे.

    ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेला लाभणार नवी दिशा

    वैद्यकीय क्षेत्रातील विकास हा केवळ शहरांपुरता मर्यादित राहून चालणार नाही. ग्रामीण आणि दुर्गम भागात दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहोचविणे ही मोठी गरज आहे. ‘पल्स-२०२६’ परिषदेमुळे ग्रामीण वैद्यकीय सेवेसाठी नव्या संकल्पना आणि उपाययोजना समोर येतील. टेलीमेडिसिन, मोबाइल हेल्थ युनिट्स, डिजिटल हेल्थ रेकॉर्ड्स आणि आधुनिक निदान तंत्रज्ञान यांच्या मदतीने ग्रामीण भागातही दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता येऊ शकते. या तंत्रज्ञानांचा वापर कसा वाढवता येईल यावर परिषदेत चर्चा केली जाणार आहे.

    वैद्यकीय क्षेत्रातील नवकल्पनांचा संगम

    ‘पल्स-२०२६’ परिषद ही केवळ वैद्यकीय चर्चांपुरती मर्यादित नसून वैद्यकीय क्षेत्रातील नवकल्पनांचा संगम घडविणारा मंच ठरणार आहे. या परिषदेत स्टार्ट-अप्स, संशोधन संस्था, औषधनिर्मिती उद्योग, वैद्यकीय उपकरण उत्पादक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार आहेत. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील नव्या कल्पना आणि संशोधनाला प्रत्यक्ष उद्योगाशी जोडण्याची संधी मिळेल. वैद्यकीय तंत्रज्ञानातील नवकल्पना समाजापर्यंत अधिक वेगाने पोहोचण्यासाठी अशा प्रकारच्या मंचांची आवश्यकता असते.

    भविष्याच्या वैद्यकीय व्यवस्थेचा आराखडा

    आजच्या काळात वैद्यकीय व्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत. नवीन रोगांचे उद्भव, वाढते वैद्यकीय खर्च, तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा विकास आणि लोकसंख्येच्या वैद्यकीय गरजा, या सर्वांचा विचार करून भविष्यातील वैद्यकीय व्यवस्थेचा आराखडा तयार करणे आवश्यक आहे.

    या परिषदेत विविध देशांतील अनुभव, संशोधन आणि तंत्रज्ञान यांचा आदानप्रदान होऊन वैद्यकीय व्यवस्थेत अधिक प्रभावी धोरणे तयार करण्यास मदत होईल. ‘पल्स-२०२६’ ही परिषद महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी केवळ एक कार्यक्रम नसून भविष्यातील वैद्यकीय व्यवस्थेची दिशा ठरविणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. वैद्यकीय शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, उद्योग आणि शासन यांचा समन्वय घडवून वैद्यकीय क्षेत्रात व्यापक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न या परिषदेमार्फत केला जाणार आहे.

    डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वैद्यकीय व्यवस्थेत महाराष्ट्राला देशात अग्रस्थानी नेणे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनात जागतिक दर्जाचे केंद्र निर्माण करणे, ग्रामीण आणि आदिवासी भागात मजबूत प्राथमिक वैद्यकीय सुविधा उभारणे आहे.

    या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक लौकिक अधिक दृढ होईल, तसेच राज्याला वैद्यकीय पर्यटन आणि सेवांच्या क्षेत्रात नवे स्थान मिळेल. ‘पल्स-२०२६’ ही परिषद महाराष्ट्राला जागतिक वैद्यकीय नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित करेल, यात शंका नाही.

    ००००

    वर्षा फडके – आंधळे

    उपसंचालक (वृत्त)

    माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed