• Fri. Jun 12th, 2026
    Prasenjit Fadnavis: मुख्यमंत्र्यांचे चुलत बंधू महाबँकेचे संचालक! आधीच अनेक पदे असताना नव्या जबाबदारीमुळे चर्चेला उधाण

    Prasenjit Fadnavis: मुख्यमंत्रिपदासारख्या राज्यातील सर्वोच्च पदावर असलेल्या नेत्याच्या चुलत बंधूला मात्र वेगळा न्याय का, असा प्रश्न पक्षवर्तुळात विचारला जाऊ लागला आहे.

    मुख्यमंत्र्यांचे चुलत बंधू महाबॅंकेचे संचालक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : नुकत्याच झालेल्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये नेत्यांच्या मुलांना आणि नातेवाइकांना उमेदवारी नाकारणाऱ्या भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजित फडणवीस यांना मात्र अपवाद ठरवल्याचे दिसते. प्रसेनजित फडणवीस हे सोमवारी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालकांच्या निवडणुकीत निवडून आले आहेत.

    प्रसेनजित फडणवीस हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य आहेत. तर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. आता तेच बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालकपदी निवडून आल्याने घराणेशाहीचा आरोप होऊ लागला आहे.

    Maharashtra Timesसंवैधानिक पदाच्या राजीनाम्यानंतर Rupali Chakankar यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा घेणार का? राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने दिली महत्त्वाची माहिती
    भारतीय जनता पक्षाने नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत नेत्यांच्या नातेवाइकांना उमेदवारी नाकारली होती. पक्ष घराणेशाहीला थारा देत नसल्याचा संदेश त्यातून देण्यात आला होता. त्यावरून पक्षात मोठी नाराजीही पाहायला मिळाली.

    बँकेच्या समभागधारक संचालक (शेअरहोल्डर्स डायरेक्टर) पदासाठी नुकतीच निवडणूक झाली. यात रीना झा त्रिपाठी, अलोक जैन, रूमा डे आणि प्रसेनजित फडणवीस हे चार उमेदवार रिंगणात होते. दूरस्थ पद्धतीने झालेल्या या मतदानप्रक्रियेनंतर फडणवीस यांनी ४१० मतदारांची मते मिळवत मोठा विजय मिळवला. फडणवीस यांना मिळालेल्या एकूण मतांचे मूल्य ८९ कोटी ०७ लाख ९० हजार १७३ इतके आहे.
    Maharashtra TimesShivsena News: भाजप-शिवसेना राड्यात SP निलंबित; शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंसमोर आक्रमक, भाजपवर गंभीर आरोप
    विजयी होण्यासाठी फडणवीस यांच्यासह बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचारी संघटनांनी मोठी तयारी केली होती. मतदानासाठी पात्र समभागधारकांची नोंदणी करून घेण्यात आली. त्यानंतर त्यांना मतदानप्रक्रियेविषयी मार्गदर्शनही केले गेले. प्रसेनजित यांचे वडील बाळासाहेब हेदेखील बँक ऑफ महाराष्ट्रमधील अधिकाऱ्यांच्या संघटनेमध्ये अनेक वर्षे पदाधिकारी होते. आताही ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीचे बहुमूल्य मत मिळविण्यासाठीही ‘फिल्डिंग’ लावण्यात आल्याची चर्चा होती. हे निर्णायक मत मिळवल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.
    Maharashtra TimesAjit Pawar: अजितदादांसाठी महायुती सरकारला वेळ नाही? CM च्या अनुपस्थितीचे कारण देत महिनाभर अपघातावरील चर्चा टाळली
    याचसाठी केला होता अट्टाहास…
    फडणवीस यांना संचालकसाठी तिसऱ्या प्रयत्नात यश आले आहे. याच पदासाठी पहिल्यांदा त्यांनी केलेला अर्ज बाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांनी ही निवडणूक लढवली. यावेळी सिंडिकेट बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी साठ कोटी मते मिळवून विजय मिळवला होता. बँकेची सरकारनंतर सर्वांत मोठी समभागधारक असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीचे मत मिळवता आल्याने महापात्रा यांचा विजय सुकर झाला होता. महापात्रा यांना बँकिंग क्षेत्रातील कामाचा दीर्घ अनुभव असून सिंडिकेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मात्र, निवडीच्या दुसऱ्याच दिवशी महापात्रा यांनी अचानक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून पदाचा राजीनामा दिला. त्यासाठी त्यांनी कार्यबाहुल्यामुळे वेळ देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. अचानक एकाच दिवसात त्यांना ही उपरती कशी झाली याची खमंग चर्चा बँकेच्या वर्तुळात सुरू होती. इतकेच नव्हे तर फडणवीस यांच्यासाठीच त्यांनी राजीनामा दिल्याचीही चर्चा बँक वर्तुळात सुरू होती.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा