• Sun. Jun 14th, 2026

    Ashok Kharat Case: खरातच्या ‘कुकर्मां’चा वाढता पाढा! नव्या तीन फिर्यादी, अत्याचाराचे 6 गुन्हे नोंद, कोर्टात आज सर्व खुलासे

    Ashok Kharat Case: खरातच्या ‘कुकर्मां’चा वाढता पाढा! नव्या तीन फिर्यादी, अत्याचाराचे 6 गुन्हे नोंद, कोर्टात आज सर्व खुलासे

    Ashok Kharat Case: भोंदूगिरी करणारा संशयित अशोक खरात याच्याविरुद्ध सहा फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या संदर्भात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) सखोल तपास सुरू आहे.

    अशोक खरात प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: मंत्र-तंत्र, दैवी शक्ती व भविष्यवाणीच्या भीतीतून महिलांवर अत्याचार करणारा संशयित अशोककुमार खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या कुकर्मांचा पाढा दिवसेंदिवस वाढत आहे. खरातविरुद्ध सोमवारी (दि. २३) नव्याने तीन फिर्यादी नोंद झाल्या असून, त्याच्याविरुद्धच्या अत्याचारांच्या गुन्ह्यांची संख्या सहापर्यंत पोहोचली आहे. या सर्व गुन्ह्यांतील सबळ पुरावे आणि खरातच्या कुकर्मांबाबत सर्व खुलासे मंगळवारी (दि. २४) नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहेत.

    १८ मार्च २०२६ पासून नाशिक शहर आणि ‘एसआयटी’च्या अटकेत असलेल्या संशयित खरातची पोलिस कोठडी मंगळवारी (दि. २४) संपणार आहे. त्याला दुपारी नाशिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्या वेळी एसआयटीच्या प्रमुख पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते न्यायालयात महत्त्वपूर्ण खुलासे करण्याची शक्यता आहे. यासह खरातच्या वकिलामार्फतही जोरदार युक्तिवाद होणार असून, पोलिसांनी सबळ पुराव्यांच्या ‘फाइल्स’ तयार केल्या आहेत.

    Maharashtra TimesAshok Kharat : ‘मी अवतारी पुरुष, तू मागील जन्माची अप्सरा, माझ्याशी लग्न कर’, अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड
    दरम्यान, संशयित खरातविरुद्ध २८ वर्षीय पीडित महिलेने १७ मार्च रोजी, ३७ वर्षीय पीडितेच्या पतीने २१ मार्च, ३४ वर्षीय पीडितेने २१ मार्च रोजी फिर्याद दिल्याने अत्याचाराचे तीन गुन्हे नोंद होते, तर २२ मार्च रोजी आणखी तीन फिर्यादी पोलिसांत दाखल झाल्याने खरातविरुद्धच्या गुन्ह्यांची संख्या सहा झाली आहे. यासह खंडणी व मॉर्फ व्हिडीओ प्रकरण अशा तब्बल आठ गुन्ह्यांचा सध्या एसआयटी तपास करीत आहे. या सर्व गुन्ह्यांमुळे खरातविरुद्धच्या कुकर्मांची यादी वाढत असून, त्याच्याविरुद्ध न्यायालयात काय पुरावे सादर होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. गुन्ह्यांचे स्वरूप लक्षात घेता खरातच्या पोलिस कोठडीत आणखी वाढ शक्यता आहे.

    -सोमवारी ‘एसआयटी’त पोहोचलेल्या पीडिता नाशिक परिसरातल्या
    -तिन्ही पीडिता मध्यमवर्गीय घरातील असून, विवाहित आहेत
    -‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणत ‘माझ्यात ताकद नाही’ असा खरातचा दावा
    -पोलिसांत फिर्याद दिलेल्या प्रत्येक पीडितेसह त्यांच्या पतीच्या संसारात कलह
    -संशयित खरातमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त; खरातविरुद्ध पुरावे संकलनासाठी पोलिसांचे प्रयत्न
    -दाखल होणारे गुन्हे, पीडिता, तपासाबाबत ‘एसआयटी’ची कमालीची गोपनीयता
    -खरातविरुद्धच्या ‘पेन ड्राइव्ह’बाबत न्यायालयात स्पष्टता होणार
    Maharashtra TimesAshok Kharat: भोंदू बाबा अशोक खरातचं आणखी एक कांड; जमिनीच्या वादातून शेतकऱ्याचा जीव घेतल्याचा आरोप
    तक्रारदारांनी पुढे यावे’
    या संशयिताबाबत कोणाकडे माहिती, पुरावे असल्यास अथवा संशयिताने कोणाला फसवले असल्यास, अत्याचार केला असल्यास, खरातने काही इतर गुन्हे केले असल्यास त्या संदर्भात ‘एसआयटी’कडे प्रत्यक्ष किंवा लेखी माहिती द्यावी. तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असे ‘एसआयटी’ प्रमुख तेजस्वी सातपुते (आयपीएस) यांनी सांगितले आहे. यासह संशयिताबाबत ९५०३२ ७०२२४ किंवा ७७७५८ १६३८९ या क्रमांकावर संपर्क साधत ‘एसआयटी’पर्यंत तक्रारदारांनी पोहोचावे, असेही सातपुते यांनी स्पष्ट केले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा