अचानक ट्रिगर दाबला आणि क्षणातच जोराचा आवाज झाला… हा आवाज होता गोळीबाराचा. रंगलेल्या गप्पा-टप्पांमध्ये अचानक गोळी थेट एका अल्पवयीन मुलाच्या कंबरेत जाऊन घुसली. मुंढव्यातील केशवनगर परिसरात घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : आपण काय करतोय? याचं भान आपल्याला असायला हवं. तसेच प्रत्येक गोष्टीचं गांभीर्य असणं देखील आवश्यक आहे. विशेष म्हणजे पिस्तूल सारख्या गोष्टी सर्वसामान्य नागरिकांकडे असण्याचं कारण नाही. तरुणांनी आपल्या करियरकडे पाहणं जास्त आवश्यक आहे. पण काही तरुण गुन्हेगारीचा मार्ग निवडतात. त्यातून ते चुकीच्या मार्गाने पिस्तूल मिळवतात. त्यानंतर ते दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. पण ही पिस्तूल सर्वसामान्य परिसरात बाहेर काढली तर काय परिणाम होऊ शकतो? याचा प्रत्यय पुण्यात आलेला बघायला मिळतोय. पुण्यात एका पिस्तूलातून चुकून गोळी सुटली आणि ती अल्पवयीन मुलाच्या कंबरेला लागली. यामध्ये हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
१८ मार्चला रात्री साडेनऊच्या सुमारास काही तरुण गुरुकृपा सोसायटी परिसरातील मोकळ्या जागेत एकत्र जमले होते. सर्वांमध्ये गप्पा-टप्पा सुरू असताना त्यांच्यापैकी एकाने खिशातून देशी बनावटीचे पिस्तूल बाहेर काढली. सुरुवातीला कुतूहल म्हणून ते एकमेकांना दाखवले जात होते. काही तरुणांनी ते हाताळूनही पाहिले.
अचानक ट्रिगर दाबला अन…
यानंतर पिस्तूल पुन्हा एका तरुणाच्या हातात आले. त्याने ते थेट एका अल्पवयीन मुलाच्या दिशेने रोखले. काही क्षण सगळे स्तब्ध झाले… आणि अचानक ट्रिगर दाबला गेला. क्षणातच गोळी सुटली आणि ती मुलाच्या कंबरेत जाऊन लागली.
गोळी लागल्याबरोबर मुलगा वेदनेने खाली कोसळला. परिसरात आरडाओरड आणि गोंधळ सुरू झाला. उपस्थित तरुणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही जण घटनास्थळावरून पळून गेले, तर काहींनी जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात हलवले. सध्या गोळीबारात जखमी मुलावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. डॉक्टरांकडून त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.
तिघांना अटक
दरम्यान, धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी घटनेचा सखोल तपास केला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीकडून पिस्तूल जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे. मात्र त्यांच्याकडे पिस्तूल आले कुठून? अशा बेफिकीर घटना अजून किती घडणार? असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा