• Tue. Jun 9th, 2026
    summer Special Train: कोकण वाऱ्यावर, यूपी डोक्यावर! 1500 विशेष रेल्वेगाड्यांपैकी कोकणसाठी केवळ 36 गाड्या

    Kokan Summer Special Trains 2026: मध्य रेल्वेच्या विशेष फेऱ्यांच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी निम्म्याहून अधिक विशेष फेऱ्या चालवण्यात येत आहेत.

    कोकण रेल्वे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    महेश चेमटे, मुंबई : कोकणात एप्रिल-मेच्या सुट्टीत जाणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी रेल्वे हा मुख्य आधार असतो. मात्र, यंदाही रेल्वे प्रशासनाच्या नियोजनात कोकण प्रवासी दुय्यम ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे. उन्हाळी सुट्टीत कोकणच्या प्रवाशांना रेल्वेने अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे, तर उत्तर भारतातील प्रवाशांना डोक्यावर घेतल्याचे चित्र दिसते. दीड हजार विशेष गाड्यांपैकी कोकणासाठी केवळ ३६ गाड्या दिल्या आहेत.

    मध्य रेल्वेकडून उन्हाळी प्रवासी गर्दीसाठी २०१२ विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. गर्दी विभागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस अशा मोठ्या स्थानकांवर प्रवासी ‘होल्डिंग एरिया’ तयार करण्यात येत आहेत. उन्हाळ्यात मध्य रेल्वेच्या १९ मार्गांवर दीड हजार फेऱ्या चालवण्यात येत आहेत.

    Maharashtra TimesAjit Pawar: अजितदादांसाठी महायुती सरकारला वेळ नाही? CM च्या अनुपस्थितीचे कारण देत महिनाभर अपघातावरील चर्चा टाळली
    बिहारसाठी ४५० आणि उत्तर प्रदेशसाठी ३३२ फेऱ्या आहेत. समस्तीपूर, दानापूर, गोरखपूर, बलिया, वाराणसी आणि गाझीपूरसाठी एलटीटी आणि सीएसएमटीतून गाड्या रवाना होणार आहेत. राज्यातील कोल्हापूर, नागपूर, हरंगुळसाठी (लातूर) ५०० फेऱ्या असतील. मुंबईहून एलटीटी-मडगाव आणि सीएसएमटी-मडगाव या मार्गांवर एकूण ३६ फेऱ्या घोषित करण्यात आल्या आहेत.

    गोरखपूर गाडी दररोज, मडगाव गाडी केवळ गुरुवारी
    १ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान (०१०७९८०) सीएसएमटी-गोरखपूर-सीएसएमटी ही विशेष गाडी रोज धावणार आहे. १६ एप्रिल ते ११ जूनदरम्यान (०११७१/२) सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी ही साप्ताहिक स्वरूपात म्हणजे केवळ दर गुरुवारी धावणार आहे. सुट्टीच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असतानाही हा आकडा अत्यंत कमी असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

    Maharashtra TimesCentral Railway: मध्य रेल्वे वाऱ्यावर! पाच महिन्यांपासून महाव्यवस्थापकपद रिक्त असल्याने सेवेची घसरगुंडी
    ‘रस्तेमार्गे प्रवास अवघड’
    मुंबईहून कोकणात जाणाऱ्या कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी, तेजस अशा अत्यंत मोजक्या गाड्या आहेत. या गाड्यांत प्रतीक्षायादी सुरू झाल्याने विशेष गाडीची वाट पाहत होतो. यूपी-बिहारच्या तुलनेत कोकणच्या फेऱ्या कमी असल्याने तिकीटही मिळेनासे झाले आहे. कोकणात रस्तेमार्गे प्रवास अत्यंत त्रासदायक असल्याने आता गावी जायचे कसे, असा प्रश्न आहे, असे परळमधील स्थानिक गणेश सावंत यांनी सांगितले.

    ‘…तर आंदोलन’
    उन्हाळी सुट्टीच्या तोंडावर दादर-गोरखपूर एक्स्प्रेसला कायमस्वरूपी करण्याचा निर्णय होतो. उन्हाळी विशेष फेऱ्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहारसाठी सर्वाधिक रेल्वे फेऱ्या दिल्या जातत. मध्य रेल्वेचे धोरण हे ‘उत्तर भारतीय’ झाल्याचे दिसून येते. हे असेच सुरू राहिल्यास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, अशी नाराजी प्रवासी दामिनी कदम यांनी व्यक्त केली.

    खरातमुळे अजित पवारांच्या अपघाताचा विसर? दादांचा फोटो घेऊन अमोल मिटकरींचा लढा

    कोकणातील प्रमुख गाड्यांची आरक्षण स्थिती (शयनयान आरक्षण)
    दिनांक -मांडवी -कोकणकन्या -नेत्रावती -मत्स्यगंधा

    १ मे —३८ –११८ –५६ –४६
    २ मे —१५४ –६७ –२० –६५
    ३ मे —२७ –११७ –६७ –४८
    ४ मे (आरएसी) —२१ –६३ –५८ –२५
    ५ मे (आरएसी) —तीन –६२ –५२ –१९
    गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्याने सर्व आकडे प्रतीक्षायादीतील आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा