• Sun. Jun 14th, 2026
    Central Railway: मध्य रेल्वे वाऱ्यावर! पाच महिन्यांपासून महाव्यवस्थापकपद रिक्त असल्याने सेवेची घसरगुंडी

    Central Railway: मेल-एक्स्प्रेस आणि उपनगरीय रेल्वे यांच्या वक्तशीरपणाबाबत दर आठवड्याला महाव्यवस्थापकांच्या नेतृत्वाखाली बैठकही पार पडणे अपेक्षित असते.

    मध्य रेल्वे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    महेश चेमटे, मुंबई : देशातील सर्वाधिक व्यग्र रेल्वे मार्ग आणि प्रचंड प्रवासी वर्दळ असलेल्या मध्य रेल्वेत पाच महिन्यांपासून महाव्यवस्थापकच नसल्याचे परिणाम समोर येऊ लागले आहेत. नव्या महाव्यवस्थापकांनी नियुक्तीनंतर महिना उलटूनही कार्यभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे सध्या मध्य रेल्वे वाऱ्यावरच असल्याने रेल्वे प्रकल्पांसह प्रवासी सेवेला मोठा फटका बसत आहे.

    रेल्वे मंडळाच्या सूचनांची अंमलबजावणी करणे आणि मध्य रेल्वेवरील प्रवासी मागणी लक्षात घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्याचे काम महाव्यवस्थापकांचे असते. त्याचबरोबर नव्या मार्गांची निर्मिती, स्थानक सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देणे आणि बांधकाम, परिचालन, विद्युत, वाणिज्य, मॅकेनिकल या विभागांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी महाव्यवस्थापकांची आहे.

    Maharashtra TimesShivsena News: भाजप-शिवसेना राड्यात SP निलंबित; शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंसमोर आक्रमक, भाजपवर गंभीर आरोप
    महाव्यवस्थापक (जीएम) हे क्षेत्रीय रेल्वेतील सर्वोच्च पद आहे. या पदावर वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्तीची जबाबदारी ‘अपॉइंटमेंट कमिटी ऑफ द कॅबिनेट’कडे (एसीसी) असते. ही देशातील सर्वोच्च निवड संस्थांपैकी एक आहे. ‘एसीसी’ने १७ फेब्रुवारीला मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदासाठी शलभ गोयल यांची नियुक्ती केली. ते भारतीय रेल्वे विद्युत अभियंता सेवा (आयआरएसईई)-१९८९ बॅचचे अधिकारी आहेत.

    त्यांच्यासोबतच रेल व्हील फॅक्टरी, बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स, उत्तर रेल्वे, रेल कोच फॅक्टरी आणि उत्तर पूर्व सीमा रेल्वे यांच्या महाव्यवस्थापक पदावरील नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, नियुक्तीला महिना उलटूनही शलभ गोयल यांनी मध्य रेल्वेचा कार्यभार स्वीकारलेला नाही. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचे ११ नोव्हेंबर २०२५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर हे पद रिक्त झाले होते.

    खरातमुळे अजित पवारांच्या अपघाताचा विसर? दादांचा फोटो घेऊन अमोल मिटकरींचा लढा

    महाव्यवस्थापकपद रिक्त असल्यावर नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत त्याचा कार्यभार समकक्ष अपर महाव्यवस्थापकांकडे देण्यात येतो. कार्यभार सोपवलेले अधिकारी ठोस आणि प्रभावी धोरणात्मक निर्णय घेण्यास टाळाटाळ करतात. त्याचा परिणाम कोट्यवधी रेल्वे प्रवाशांवर होतो.

    मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर असे पाच विभाग मध्य रेल्वेत आहेत. रोज ८० लाख प्रवासी हाताळणारी मुंबई उपनगरीय रेल्वेचा समावेशही यात होतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुनर्विकासासह मुंबई लोकलसाठी नवे मार्ग बांधणे, नव्या रेल्वे मार्गांची उभारणी, स्थानक सुधारणा अशी एकूण लाखो कोटी रुपयांची कामे सध्या सुरू आहेत. मात्र त्यांच्यावर देखरेख ठेवत कामाची गती वाढवण्यासाठी सर्वोच्च अधिकारीच नाही.

    वक्तशीरपणाचे तीनतेरा
    तीन महिन्यांपासून मुंबई उपनगरीय रेल्वे तसेच लांबपल्ल्याच्या गाड्या सातत्याने विलंबाने धावत आहेत. वातानुकूलित लोकलच्या विलंबामुळे अन्य लोकलच्या संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम होतो. कोकणातून ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्या सातत्याने तीन ते पाच तासांपर्यंत विलंबाने धावत आहेत. लोकल आणि मेल एक्स्प्रेसच्या विलंबाच्या कारणांवरून चर्चा करणे, विविध विभागांतील समस्या जाणून घेत त्या सोडवणे आणि सर्वसमावेशक उपायांसह वक्तशीरपण सुधारण्यासाठी महाव्यवस्थापकांची भूमिका महत्त्वाची असताना त्यांच्या अनुपस्थितीत रेल्वेची सेवा रुळांवरून घसरत असल्याचे दिसते.

    Maharashtra TimesEknath Shinde: फडणवीसांसमोरच सभागृहात शिंदेंचा आक्रमक अवतार; भाजप नेत्यांना फटकारलं, सातारा ZP बाबत गौप्यस्फोट
    अनेक कामे अपूर्णावस्थेत

    स्थानक सुधारणेच्या नावाखाली अनेक लोकल स्थानकांतील छत काढण्यात आले आहे. ही कामे कधी पूर्ण होणार, याबाबत कोणतीही माहिती प्रवाशांना मिळत नाही. त्यामुळे रणरणत्या उन्हात लोकलसाठी ताटकळत उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांवर कोणाचाही अंकुश नाही. मुंबई लोकलमधील गर्दी विभागण्यासाठी १५ डबा लोकल वाढवण्याच्या सूचना रेल्वे मंडळाच्या आहेत. मध्य रेल्वेवर १५ डबा विस्ताराचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. महाव्यवस्थापकांच्या अनुपस्थितीचा हा परिणाम असल्याचे मानले जाते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा